
चंद्रकांत पाटलांचा पोलिसांना फोन; रोहित पवार म्हणाले पुण्यातील गुंड परदेशात…
काही दिवसांपूर्वी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या कारने एका रिक्षाला उडवलं होतं. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मात्र, अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील ही कारमध्ये नसल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना ना. पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागूनजोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर प्रकरणी आज मरगळे कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन; मदतीची मागणी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना फोन करुन दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले. यावेळी गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या यांनी फोनवरुन दिलेल्या आदेशावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन चंद्रकांत पाटील यांना काही सवाल केले आहे. रोहित पवार म्हणाले, माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…!
आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात? असा सवालही रोहित पवार यांनी केला.