
काय म्हणाला होता ते जाणून घ्या…
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर वादग्रस्त विधान करणाऱ्या युट्यूबर अजीत भारतीला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली आहे.
या प्रकरणाने देशभरात चर्चेचे वारे उठले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजीत भारतीला प्रथम नोएडा सेक्टर-58 पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर डीसीपी कार्यालय, 12/22 चौकी येथे त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, सीजेआयवर झालेल्या घटनेवर भारतीने सोशल मीडियावर आणि त्याच्या युट्यूब चॅनेलवर केलेल्या टिप्पणींना भडकाऊ आणि समाजात द्वेष निर्माण करणारे मानले जात आहे.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी “सनातनचा अपमान सहन करणार नाही हिंदुस्थान” अशी घोषणा देत सीजेआय बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अजीत भारती ने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “ही फक्त सुरुवात आहे. असे पतित, हिंदूविरोधी आणि भ्याड न्यायाधीश रस्त्यावरही याच प्रकारे सामोरे जातील. जर ते आपल्या निर्णयात लिहिलेल्या गोष्टींपलीकडे जाऊन हिंदूंना खालच्या स्तरावर दाखविण्यासाठी विषारी विचार प्रकट करतील, तर त्यांना त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल.
या वक्तव्यांमुळे न्यायपालिकेविरुद्ध द्वेष पसरविल्याचा आरोप भारतीवर करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाच्या संवेदनशीलतेचा विचार करून सखोल तपास सुरू केला असून पुढील कारवाईबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, अजीत भारतीच्या समर्थकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत त्याच्या तात्काळ सुटकेची मागणी केली आहे.
दुसरीकडे, वकील राकेश किशोरने आपल्या कृतीचे समर्थन करत म्हटले, मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप नाही. मी केवळ परमेश्वराची इच्छा पूर्ण केली आहे. तोच ठरवेल की मला जेलमध्ये जायचे, फाशी व्हायची की मृत्यू पत्करायचा.
या संपूर्ण प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेचा अपमान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन्ही विषयांवर नव्याने वाद पेटला आहे.