
ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल केली !
मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याने राज्यभरात आता ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
नागपूरमध्ये ओबीसी समाजाने भव्य मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यात आली. त्यावरून आता सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. या मोर्चातून ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शुक्रवारी नागपूरमध्ये ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला. त्यामध्ये राज्य सरकारवर टीका करण्यात आली. त्याशिवाय 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली जात आहे. आता यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचे नियोजित षडयंत्र आहे. 2 सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. मराठवाड्याबाहेरचा हा जीआर नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजाचे हित आमचे सरकार जाऊ देणार नाही. हा जीआर केवळ हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला आहे. केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. राज्यात कुठेही हा जीआर लागू नाही, असे बावनकुळे म्हणाले. त्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. छगन भुजबळांना वारंवार सांगितले आहे की, प्रांत आणि तहसीलदार खोटे, चुकीचे प्रमाणपत्र देणार नाहीत. याची काळजी सरकारने घेतली आहे. एकही प्रमाणपत्र खोटं दिलं जाणार नाही असे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी समाजाचे आरक्षण गेले. मंत्रीमंडळात वडेट्टीवार त्यावेळी होते. देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिल्याचे बावनकुळे म्हणाले. सत्तेत असताना काही करायचे नाही, आणि सत्ता गेल्यावर कांगावा करायचा. ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे वचन शिष्टमंडळाला दिले असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
त्यासोबतच बैठक झाली त्यावेळी विजय वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते. प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला होता. या जीआरचा कोणीच दुरुपयोग करणार नाही. जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.