
शशिकांत शिंदेंची एन्ट्री रोखण्यासाठी साताऱ्यात नवा डाव…
सातारा तालुक्यात जिल्हा परिषदचे आठ गट, तर पंचायत समितीचे 16 गण आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही भारतीय जनता पक्षात आहेत, त्यामुळे येथील कार्यकर्त्यांचे लक्ष नेत्यांच्या भूमिकेकडे आहे. नेत्यांनी मनोमिलनाच्या माध्यमातून भाजपच्या चिन्हावर लढायचे ठरविले, तर निम्म्या निम्म्या गट, गणांची वाटणी होईल. पण, स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास वेगळे चित्र पाहायला मिळेल. सध्या तरी दोन्ही राजेंची भूमिका गुलदस्त्यात असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लक्ष घालण्याची तयारी केल्यामुळे दोन्ही राजेंकडच्या नाराजांची साथ त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
सातारा (Satara) तालुक्यात आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व राहिले आहे. मागील वेळी सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहापैकी सात गटात शिवेंद्रसिंहराजेंच्या विचारांचे उमेदवार निवडून आले होते, तर तीन गटांत खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीचा विजयी झाला होता. भाजपला एक जागा मिळाली होती.
सातारा तालुक्यात आता अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. दोन्ही राजे भाजपमध्ये असून, शिवेंद्रसिंहराजे (Shivendraraje Bhosale) यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा, जावळीसह कऱ्हाड उत्तर, कोरेगाव या मतदारसंघात आपली ताकद दाखवावी लागणार आहे. तसेच, जास्तीत जास्त गट कसे निवडून येतील, यासाठीही रणनीती आखावी लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांची सूचना काय?
खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील वेळी सुरुवातीला जिल्हा विकास आघाडीची घोषणा केली. नंतर सातारा तालुक्यात विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिले होते. पण, त्यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. आता दोघेही भाजपमध्ये असल्याने दोघांच्या मनोमिलनातून सातारा तालुक्यातही निवडणूक होण्याचे संकेत आहेत. पण, दोघांनीही मनोमिलनाचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दोघांनाही या निवडणुकीत एकत्र ठेवण्याचा प्रयत्न होऊन कमळ चिन्हावरच निवडणूक लढण्यासाठी सूचना होऊ शकते.
नाराजांवर राहणार लक्ष
सध्या तरी गट, गणांच्या आरक्षणाची वाट पाहात असलेल्या तालुक्यातील इच्छुकांना आरक्षणासोबतच नेत्यांच्या भूमिकेचीही तितकीच उत्सुकता आहे. तालुक्यात महाविकास आघाडीची ताकद फारशी नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सातारा तालुक्यात लक्ष घालून महाविकासच्या माध्यमातून काही गट, गणात उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही राजेंच्या गटातील नाराजांना आमदार शिंदे यांची साथ मिळू शकते.
महाविकास आघाडीला रोखण्याची खेळी
महाविकास आघाडीचा सातारा तालुक्यात हस्तक्षेप टाळण्यासाठी दोन्ही राजेंचे गट स्वतंत्र लढून महाविकास आघाडीला उमेदवार मिळवून न देण्याचीही काळजी घेऊ शकतात. त्यामुळे सातारा तालुक्यात दोन्ही राजेंच्या भूमिकेभोवतीच गट, गणांचे राजकारण फिरणार आहे.
दुसरीकडे सातारा तालुक्याचा कऱ्हाड उत्तर आणि कोरेगाव मतदारसंघात समाविष्ट भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी भाजपसोबतच राहण्याची सूचना केली आहे. त्यामुळे येथून आमदार मनोज घोरपडे आणि महेश शिंदेंची भूमिका काय राहणार व सह्याद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र येणाऱ्या गावांमध्ये बाळासाहेब पाटील कोणाच्या बाजूने कौल देणार? हेही तितकेच महत्त्वाचे असेल.
सातारा तालुका मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल (जिल्हा परिषद सदस्य)
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गट : सहा (राष्ट्रवादी)
खासदार उदयनराजे भोसले गट : तीन (साविआ)
भाजप : एक
पंचायत समिती :
राष्ट्रवादी काँग्रेस : ११ (शिवेंद्रसिंहराजे गट)
सातारा विकास आघाडी : आठ (उदयनराजे गट)
भारतीय जनता पक्ष : एक
सध्याचे नवीन गट : आठ, गण : १६