
जागावाटपात भाजपसह नितीश कुमारांनाही झुकवलं…
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अखेर एनडीएच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील मॅरेथॉन बैठकांनंतर जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अपेक्षेप्रमाणे भाजप आणि संयुक्त जनता दल शंभरहून अधिक जागा लढणार आहे. मात्र, या जागावाटपामध्ये केंद्रीय मत्री चिराग पासवान यांनी हनुमान उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
जागावाटपामध्ये चिराग पासवान यांनी भाजपसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही झुकवले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. त्यापैकी प्रत्येकी 101 जागांवर भाजप आणि जेडीयूचे उमेदवार असतील. तर पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाला 29, उपेंद्र कुशवाह आणि जीनराम मांझी यांच्या पक्षाला प्रत्येक सहा जागा वाट्याला आल्या आहेत.
बिहार भाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटपामध्ये काही महत्वाच्या गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. आता भाजप आणि जेडीयूमध्ये छोटा-मोठा भाऊ कुणी नसेल. दोघांनाही सारख्याचा जागा मिळाल्या आहेत. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी दोन्ही पक्षांच्या वाट्याला अनुक्रमे 9 व 14 जागा कमी आल्या आहेत.
मागील निवडणुकीवेळी चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. ते एनडीएमध्य नव्हते. त्यांनी 135 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. मात्र, केवळ एकाच जागेवर विजय मिळाला होता. मात्र, त्यांच्या उमेदवारांमुळे एनडीएच्या उमेदवारांना फटका बसला होता. एनडीएमध्ये आल्यानंतर चिराग यांनी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून देत 100 स्ट्राईक रेट ठेवला.
परिणामी विधानसभा निवडणुकीसाठी चिराग यांनी थेट 40 जागांची मागणी केली होती. चिराग हे स्वत:चा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हनुमान असा करतात. जागावाटपात त्यांनी खरोखरच हनुमान उडी घेतली आहे. त्यांच्या पदरात २९ जागा पडल्या असल्या तरी त्यामुळे भाजप आणि जेडीयूच्या जागा कमी झालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मिळालेला प्रतिसाद तसेच दलित चेहरा म्हणून एनडीएमध्ये त्यांना झुकते माप द्यावे लागले आहे.
तर ठरू शकतात किंगमेकर
बिहारमध्ये निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत आडाखे बांधले जात आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘एनडीए’साठी चिराग पासवान हे किंगमेकर ठरू शकतात, असे मानले जात आहेत. लोकसभेतील त्यांनी आपला स्ट्राईक रेट कायम ठेवला किंवा त्याच्या जवळपास पोहचले तरी बिहार सरकारमधील त्यांच्या पक्षाला मोठे महत्व प्राप्त होणार, हे निश्चित.