
भाजप-जदयूला समान जागा; ‘लोजपा’ला २९ तर ‘रालोमो’ला ६ जागा…
नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) जागावाटप रविवारी ठरले. भाजप व जदयू प्रत्येकी १०१ जागांवर लढतील, तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या ‘लोजपा (रामविलास) ‘ला २९ जागा देण्यात आल्या.
उपेंद्र कुशवाह यांच्या ‘रालोमो ‘ला ६ तर जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ पक्षाला ६ जागा दिल्या आहेत.
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल.
इंडिया आघाडीची आज बैठक
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या जागावाटपाचे सूत्र आज सोमवारी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव रविवारी दिल्लीला रवाना झाले असून घटक पक्षांची बैठक होणार आहे.
घटक पक्षांकडून स्वागत : हे जागावाटप
जाहीर झाल्यानंतर एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी याचे जोरदार स्वागत केले. नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याच्या दृष्टीने ही एकजूट असल्याचे जायसवाल म्हणाले.
छोटा भाऊ-मोठा भाऊ नव्हे, तर केली थेट बरोबरीच
भाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी १ माहिती देताना सांगितले की, हे जागावाटप अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण झाले.
एनडीएच्या जागावाटपाचे सूत्र पाहता बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल (यु.) आणि भाजप यांच्यात यंदा छोटा भाऊ-मोठा भाऊ हा विचार न होता थेट दोन्ही पक्ष बरोबरीत आणण्यात आले आहेत.
नाराजी नाही : मांझी
‘हम’चे प्रमुख जितमराम मांझी यांनीही जागावाटपाचे स्वागत करून यात कोणतीही नाराजी नसल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘हम’ला एकच जागा मिळाली, तेव्हा थोडीच आम्ही नाराज होतो?, असे मांझी यांनी म्हटले आहे.