
देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा ‘या’ नगरपालिकेसाठी मोठा निर्णय !
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याचे चित्र अजुनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना एकाकी पाडण्याची रणनीती भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आखण्यात येत असल्याची चर्चा आहे.
नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा देत शिंदेंसोबत युती नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यातच अंबरनाथ-कुळगाव बदलापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे.
या युतीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना नाही. त्यामुळे महायुतीमधील पक्षांविरोधातच शिंदेंच्या शिवसेनेला लढावे लागणार आहे. अंबरनाथ-कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे हे महायुतीमधून बाहेर आहेत. येथे ते स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दहा वर्षांपूर्वी तयार झालेल्या या नगरपालिकेची सत्ता गेल्यावेळी शिवसेनेकडे होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी वर्चस्व ठेवले होते. बदलापूर, अंबरनाथमधील पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत मोठ्या प्रमाणात राहिल्याचे चित्र होते. त्यामुळे या नगरपालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास शिंदेंचे कार्यकर्ते व्यक्त करत होते.
अंबरनाथ-बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे एकनाथ शिंदे येथे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे शिंदे विरुद्ध फडणवीस, पवार असे लढतीचे चित्र दिसून येईल. त्यातच अजित पवारांनी आपली ताकद वाढवत राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथाचे शहराध्यक्ष यांना आपला पक्षात प्रवेश देत त्यांच्यावर आपल्या पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे.
सत्तेसाठी अजित पवारांसोबत
सदाशिव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची नियुक्ती अंबरनाथ शहराध्यक्षपदी अजित पवारांन केली आहे. दरम्यान, राजकारणात विकासासाठी सत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे सत्तेच्या जवळ राहून काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी-भाजपच्या युतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अश्विनी पाटील यांचे नाव पुढे आल्याचे सांगितले जात आहे.