
माझं राजकीय नुकसान झालं तरी…
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांना थेट लक्ष्य करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली होती.
महायुतीत दंगा नको. माझं रवींद्र धंगेकर यांच्याशी बोलणं झालं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र, यानंतही रवींद्र धंगेकर हे भाजप (BJP) नेत्यांविरोधातील तलवार म्यान करण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण, सोमवारी त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना मी वेळ पडल्यास पुणेकरांसाठी स्वत:चं राजकीय नुकसान करायला तयार असल्याचे म्हटले.
या सगळ्या प्रकरणात मी पुणेकरांसाठी बोलत आहे. यावर बोलल्याने उलट माझं राजकीय नुकसान होत आहे. मात्र, त्याची किंमत मोजायला मी तयार आहे, अस स्पष्ट मत शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केले . एकनाथ शिंदे माझा पाठीशी आहेत त्यांनाही गुन्हेगारी नको आहे. भाजपचे नेते टीका करतात त्यांनी स्वतःला आरशात पाहावे, असा टोलाही यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हाणला.
काल शिंदे साहेब जे बोलले, ती माझीच भाषा होती. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त आणि भयमुक्त केले पाहिजे, असे ते म्हणाले. शिंदे साहेबांशी माझी जी चर्चा झाली त्यावर मी सविस्तर बोलेन. एकनाथ शिंदे म्हणाले का, पुण्यातील गुन्हेगारी सुरु राहू दे. तू यावर बोलू नकोस. मी कोणावरही टीका केली नाही, मी फक्त पुण्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना प्रश्न विचारले. मी टीका कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करेन. माझं आजही म्हणणं तेच आहे. मी कोणावर टीका करतोय, त्यापेक्षा पुणे हे भयमुक्त झालं पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. मी पबवर टीका केली तेव्हा ते माझ्याविरोधात उभे राहिले. पोर्शे प्रकरणात बोलल्यावर ते लोक माझ्याविरोधात गेले, गुन्हेगारही माझ्याविरोधात आहेत, असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
रवींद्र धंगेकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, त्यांना मी सांगितलं आहे महायुतीत दंगा नको. पण रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं की, पुण्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. लेकीबाळींना व्यवस्थित फिरता आलं पाहिजे. गोरगरीब जनतेला सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये. सर्वांना निर्भयपणे फिरता आलं पाहिजे. गुन्हेगारांना क्षमा नाही, कुणीही असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू. कुठल्याही गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही. गुन्हेगारी मुक्त पुणे व्हावं हेच त्यांचं म्हणणं होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत आहेत मुख्यमंत्र्यांकडे हे खाते आहे. गृह विभागाकडून सक्षमपणे गुंडागर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.