
आता तिथे…
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी गेल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी त्यांनी अफगाणिस्तान सोडून गेलेल्या शीख व हिंदूंना आवाहन केलं की तुम्ही मायदेशी परत येऊ शकता, अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करू शकता.
अफगाणिस्तानात तुमचं स्वागत केलं जाईल. दोन्ही समुदायांच्या एका १३ सदस्यीय संयुक्त शिष्टमंडळाने दिल्लीत मुत्ताकी यांची भेट घेतली. यावेळी मुत्ताकी यांनी अफगाणी हिंदू व शीखांना अफगाणिस्तानला परतण्याचं आवाहन केलं.
मागील काही दशकांमध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदू व शीखांसह मुस्लिमेतर समुदायातील लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. परिणामी सुरक्षिततेसाठी तिथल्या मुस्लिमेतर समुदायाने भारतात आश्रय घेतला. अफगाणिस्तानमधून आलेले हजारो हिंदू व शीख दिल्लीसह भारतात आणि जगभरातील अनेक देशांमध्ये विखुरले आहेत. त्यांच्या शिष्टमंडलाने दिल्लीत अफगाणिस्तानच्या दूतावासात मुत्ताकी यांची भेट घेतली. सध्याच्या घडीला गुरुद्वारे व मंदिरांच्या देखभालीसाठी ५० हून कमी अफगाणी शीख व हिंदू अफगाणिस्तानात आहेत.
अफगाणिस्तालना परत जाण्याला काहीच अर्थ नाही : गुलजीत सिंग
शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यासमोर वेगवेगळ्या मागण्या केल्या. यामध्ये अफगाणिस्तानमधील हिंदू व शिखांच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा आणि दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य, बळकावलेल्या त्यांच्या जमिनी व वास्तू मुक्त करणे, भारत-अफगाणिस्तान मल्टीपल एंट्री-एक्झिट व्हिसा सुरू करण्यासारख्या मागण्या शिष्टमंडळाने मांडल्या. त्यानंतर शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाऱ्या गुलजीत सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, आता अफगाणिस्तालना परत जाण्याला काहीच अर्थ नाही.
आम्हाला आता फक्त अफगाणिस्तानमधील धार्मिक स्थळांची चिंता
गुलजीत सिंग म्हणाले, तालिबानी मंत्री आम्हाला म्हणाले, हिंदू व शिखांनी परत यावं, तिथे सोडून दिलेले व्यवसाय पुन्हा चालू करत असल्यास आम्ही स्वागतच करू. परंतु, आता मागे जाण्याला काहीच अर्थ नाही. तालिबानी शासनात अफगाणिस्तानमध्ये शीख व हिंदुंच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय आहे. आम्हाला आता केवळ तिथल्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची चिंता आहे. त्यांनी तिथली आमची धार्मिक स्थळं दुरुस्त करावी, त्यांना सुरक्षा प्रदान करावी एवढीच आमची इच्छा आहे.