
चिखलीकरांचा अशोक चव्हाणांच्या वर्मी घाव…
नांदेड जिल्ह्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षात लगीनघाई सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
एकमेकांचे पारंपारिक विरोधक असलेले भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन नेत्यांमध्ये आपापला पक्ष नंबर एक करण्याची स्पर्धा लागली आहे. यातूनच गेल्या काही दिवसापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून भाजपचे (BJP) खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील सुप्त संघर्ष पाहवयास मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जवळ आल्याने या दोघांतील वाद पुन्हा एकदा नव्याने उफाळून आला आहे. अर्धापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी पुन्हा एकदा कोणाचेही नाव न घेता थेट भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला केला आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार प्रताप पाटील-चिखलीकर म्हणाले, ‘मी पक्ष बदलला म्हणून दुसऱ्याने देखील पक्ष बदलला. परंतु मी कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही, असे त्यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. मी परिस्थितीने लहान कार्यकर्ता असलो तरी स्वाभिमानी आहे. कधी कोणापुढे झुकलो नाही, आणि या पुढे आयुष्यात कधी झुकणार नसल्याचे चिखलीकर यांनी स्पष्ट केले.
मी आतापर्यंत 18 निवडणुका लढवल्या आणि त्यापैकी 16 निवडणुका जिंकल्या आहेत. मागच्या दाराने कधीच गेलो नाही. माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार नव्हते, मागच्या दारातुन जायला. आजपर्यंत मी ज्या काही आहे त्या निवडणूका जनतेसमोर लढल्या आणि जिंकल्या आहेत, मागच्या दाराने राज्यसभेवर गेलो नाही, असा टोला त्यांनी अशोक चव्हाण यांना नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमप्रसंगी प्रताप पाटील-चिखलीकरांनी लगावला. दरम्यान चिखलीकर यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवे वादळ येणार का ? तसेच याचे पडसाद येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण-प्रताप चिखलीकर हे दोघेही आपापल्या पक्षातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. विशेषता हे दोन्ही नेते महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष काय भुमीका घेणार याची उत्सुकता लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती होते की मग स्वबळाचा विचार केला जातो? यावर चिखलीकर-चव्हाण यांच्यातील संघर्ष थांबणार की वाढणार? हे ठरणार आहे.