
मोठी जबाबदारी टाकली खांद्यावर…
सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलेला आहे. आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झालेला आहे. राज्यात या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसने पक्षाच्या ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. यशपाल भिंगे यांची नियुक्ती केली आहे
भिंगे हे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवास कारणीभूत ठरले होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार प्रा. यशपाल भिंगे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राज्याच्या ओबीसी राजकारणात समतोल साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला असल्याचं मानलं जात आहे.
प्रा. यशपाल भिंगे हे मराठी विषयाचे प्राध्यापक असून नांदेडमधील मौर्य प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. सामाजिक न्याय, शिक्षण आणि बहुजन सक्षमीकरणासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
या निवडणुकीत भिंगे यांनी तब्बल दीड लाखांहून अधिक मतं मिळवली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
निवडणुकीनंतर भिंगे यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत (BRS) प्रवेश केला होता. 2023 मध्ये महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार सुरू असताना भिंगे हे त्या पक्षातील महत्त्वाचे मराठी नेते म्हणून ओळखले गेले. मात्र, त्यांनी 2024 मध्ये काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
सध्या राज्यात ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनला आहे. अशा वेळी ओबीसी समाजात चांगला प्रभाव असलेल्या आणि समाजाच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या प्रा. यशपाल भिंगे यांच्याकडे ओबीसी विभागाची सूत्र देणे, ही काँग्रेसमधील मोठी घडामोड मानली जात आहे.