
जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट…
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र टीकास्त्र सोडत त्यांच्या राजकीय पाठिंब्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तुम्ही जेव्हा तुरुंगातून बाहेर आलात, तेव्हा मराठा समाजानेच तुम्हाला आर्थिक मदत केली. सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला २० कोटी रुपये दिले, तेव्हा तुम्ही अन्न-पाण्याला लागलात, अन्यथा तुम्हाला पुन्हा भाजी विकावी लागली असती,’ अशी परखड टीका जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली.
ओबीसी नेत्यांना उद्देशून बोलताना जरांगे म्हणाले, “तुमचा इतिहास आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला आम्ही मोजीतही नाही.” ते पुढे म्हणाले की, “तुम्हाला कोणी सांगितले की ते ओबीसी नेते आहेत म्हणून? ते फक्त एका विशिष्ट जातीचे नेते आहेत आणि त्यांच्या आजच्या मोर्चात एका विशिष्ट जातीचेच लोक सहभागी होणार आहेत. ते खरे ओबीसीचे शत्रू आहेत,” अशी थेट टीका जरांगे यांनी केली.
‘हा ओबीसीला महापापी लागला आहे’
काही ओबीसी नेत्यांच्या पूर्वीच्या राजकीय आणि व्यक्तिगत जीवनावर टीका करताना जरांगे म्हणाले, “बरं झालं तुम्ही शाळेत गेला आणि बाकीचे शाळेत जात नव्हते. बराच काळ जेलमध्ये गेलात. हा माणूस ओबीसीला महापापी लागला आहे.” आरक्षणाला विरोध करणाऱ्या या नेत्यांमुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘मराठवाड्यातील मराठ्यांसाठीच आहे जीआर’
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आरक्षणाचा जीआर केवळ मराठवाड्यासाठी आहे. “आता शेतकऱ्यांवर संकट आहे, जीआर मराठवाड्यासाठी आहे आणि संकट देखील मराठवाड्यावरच आले आहे. आता शेतकरी मोकळे झाल्यावर अर्ज करतील,” असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी लोकशाही मार्गाने मोर्चे काढणे, आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे मान्य केले. मात्र, त्याच वेळी त्यांनी मराठा समाजाचे सर्व जिल्हे बालेकिल्ले असून, मराठा समाज एकत्र आहे, हे देखील अधोरेखित केले.