
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरू आहेत. गेल्या आठवड्यात इस्लामाबादने काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या ठिकाणांवर हल्ला केला तेव्हा हा संघर्ष सुरू झाला.
८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या लढाईनंतर बुधवारी संध्याकाळी युद्धबंदीवर सहमती झाली. मात्र, शुक्रवारी रात्री पाकिस्तानने या युद्धबंदीचे उल्लंघन करत अफगाणिस्तानवर हवाई हल्ले सुरू केले. पाकिस्तानी लष्कराने पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले. यावेळी त्यांनी निवासी घरांवर निशाण साधला, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, अफगाणिस्तानचे ३ नावाजलेले क्रिकेटपटू ठार झाले.
३ अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील उरगुन आणि बरमल जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले केले. हे हल्ले रहिवासी भागांना लक्ष्य करून करण्यात आल्याचे बोलले जात आहे, ज्यात मोठ्या संख्येने नागरिक राहत आहेत.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पाकिस्तानवर गंभीर आरोप
या भ्याड हल्ल्यात आपल्या तीन तरुण क्रिकेटपटूंना गमावल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ‘एक्स’वर एक निवेदन जारी करून आगामी त्रिकोणीय टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, “अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील शूर क्रिकेटपटूंच्या दुःखद हौतात्म्याबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहे, ज्यांना पाकिस्तानी प्रशासनाने केलेल्या भ्याड हल्ल्यात लक्ष्य केले गेले.
सामना खेळून परतत असताना झाला हल्ला
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून हे तीन क्रिकेटपटू पक्तिका प्रांताची राजधानी शाराना येथे एका क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. उरगुन येथील आपल्या घरी परतल्यानंतर ही घटना घडली. “या घटनेत, तीन खेळाडू (कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून) आणि उरगुन जिल्ह्यातील इतर पाच लोक मारले गेले, तर सात जण जखमी झाले,” असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
आगामी मालिका रद्द
या भीषण घटनेनंतर एसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या त्रिकोणीय टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत अफगाणिस्तान सहभागी होणार नाही. या मालिकेत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश सहभागी होणार होते. एसीबीने या हल्ल्याला अफगाणिस्तानच्या क्रीडा समुदाय, ॲथलीट्स आणि क्रिकेट कुटुंबासाठी मोठी हानी मानले आहे.
टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण सीमापार चकमकीनंतर युद्धविराम झाला होता. मात्र, पाकिस्तानने हवाई हल्ले करून या कराराचे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे दोन्ही शेजारील राष्ट्रांमधील तणाव आता अधिकच वाढला आहे.