
तायवाडेंचे वडेट्टीवारांना समर्थन; भुजबळांवर हल्लाबोल…
बीड येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या ‘महाएल्गार’ सभेनंतर ओबीसी नेत्यांमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बीडच्या सभेत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी वडेट्टीवारांनी समर्थन दर्शविल्याचे या व्हिडिओतून दाखवून भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता तायवाडे यांनी भुजबळांवर टीका केली आहे.
तायवाडे यांचा पलटवार
भुजबळांच्या बीडच्या सभेतील कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत बबनराव तायवाडे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. “बीडचा मंच राजकीय नव्हता, तो ओबीसींच्या संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठीचा सामाजिक प्लॅटफॉर्म होता,” असे तायवाडे म्हणाले.
एखाद्या नेत्याची भूतकाळात झालेली चूक सार्वजनिकरित्या दाखवून ते ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीका तायवाडे यांनी भुजबळांवर केली. विजय वडेट्टीवार ओबीसींसाठीच काम करत आहेत, असे स्पष्टीकरण देत तायवाडे यांनी वडेट्टीवारांचे समर्थन केले. इतर अनेक ओबीसी मोर्चांना भुजबळ का हजर राहिले नाहीत, असा सवाल करत तायवाडे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
मूळ मुद्दा काय ?
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर ओबीसी समाजात प्रचंड रोष आहे. याच पार्श्वभूमीवर बीड येथे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेनंतर ओबीसी नेतेच आपापसात भिडल्याने ओबीसी समाजाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांमध्ये एकमत नसून मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत.