
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा उल्लेख करत उच्च न्यायालयाची टिप्पणी…
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकतेच असे निरीक्षण नोंदवले आहे की, “राज्यात जातीय हिंसाचार आणि भेदभावाच्या वारंवार घडणाऱ्या घटना धक्कादायक आहेत.
जर जातीचे समर्थन रोखले गेले नाही, तर स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या लोकांचे अस्तित्व एक ते दीड शतकात नष्ट होईल.” यावेळी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील बूट हल्ल्याचाही उल्लेख केला.
दमोह जिल्ह्यात ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेची स्वतःहून दखल घेत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी हे निरीक्षण नोंदवले. या घटनेत ओबीसी समुदायातील एका व्यक्तीचा उच्चवर्णीय ग्रामस्थांनी अपमान केला होता. त्यांनी पीडिताला एआय-जनरेटेड मीम शेअर केल्याच्या आरोपाखाली एका उच्चवर्णीय व्यक्तीचे पाय धुण्यास भाग पाडले होते.
न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती प्रदीप मित्तल यांच्या खंडपीठाने या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर लावलेल्या सौम्य कलमांवर कठोर शब्दांत टीका केली. खंडपीठाने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी पीडित व्यक्तीचे पाय धुतले
“हे तेच राज्य आहे जिथे एका उच्चवर्णीय व्यक्तीने एका आदिवासी व्यक्तीच्या डोक्यावर लघुशंका केली होती. याविरोधातील संताप निवळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पीडित व्यक्तीचे पाय धुतले होते. जातींचे प्रदर्शन वाढत आहे. प्रत्येक समाज वारंवार आणि बिनधास्तपणे आपल्या जातीची ओळख मिरवत आहे, ज्याचा संपूर्ण हिंदू धर्मावर वाईट परिणाम होत आहे,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याची घटना
“प्रत्येकजण आपल्या जातीच्या प्रदर्शनाबाबत अतिशय आक्रमक होत आहे आणि विशिष्ट जातीशी संबंधित असल्याचा अभिमान दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. यामुळे जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये बळी हे कमीत कमी साक्षर आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात गरीब आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याची घटना आणि हरियाणामध्ये वरिष्ठ अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी केलेली आत्महत्या या घटना देशात जातीशी संबंधित मुद्द्यांना महत्त्व मिळाल्याची उदाहरणे आहेत”, असेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
…तर हिंदू अस्तित्वात राहणार नाहीत
“लोक स्वतःला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे संबोधतात. प्रत्येकजण त्यांची स्वतंत्र ओळख दर्शवितो. या टप्प्यावर, जर अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवले नाही, तर एक ते दीड शतकात स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या लोकांचे अस्तित्व नष्ट होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.