सारंगींच्या दाव्यानंतर प्रकाश महाजनांची सनसनाटी मुलाखत; 20 वर्षांनी नवा अँगल समोर…
प्रकाश महाजन यांनी स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून सनसनाटी खुलासा केला आहे. प्रवीण महाजन आपल्या भावाला प्रमोद महाजन यांना केवळ पैशांसाठी ब्लॅकमे करत होते.
ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालत होतं ती व्यक्ती आजही जिवंत आहे, त्यामुळे त्याचं नाव घेत नाही, असं म्हणत एबीपी माझाशी बोलताना सनसनाटी दावा केला. प्रमोद महाजन यांची हत्या ही फक्त पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरातून झाल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. सारंगी महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसावरून पंकजा मुंडे यांच्यावर बोचरी टीका करताना बिघडलेली मुलगी असा उल्लेख केला होता. धनंजय मुंडे यांच्यावरही तोफ डागली होती. यानंतर आता प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर सडकून प्रहार करत त्यांना भूतकाळाची आठवण करून देत लाज वाटत नाही का? अशीही विचारणा केली आहे.
केवळ पैसा लोभ आणि स्वार्थासाठी खून
प्रकाश महाजन म्हणाले की, ‘प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. प्रवीण महाजनने भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. प्रमोद राक्षस असला तरी त्याला गोळ्या घालायचा अधिकार कोण दिला? केवळ पैशांसाठी, लोभासाठी, आणि स्वार्थासाठी हा खून झाला. ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती आहे; काही आजही जिवंत आहेत.’ ते पुढे म्हणतात, ‘प्रवीण महाजन स्वतः काही काम करत नव्हता. नोकरीला जायचं नाही, कंपनीकडून पगार वाढ मागायचा, पैसे मागायचे एवढाच त्यांचा उद्योग होता. शेवटी जेव्हा मनुष्य एकटा पडतो, अपराधभाव आणि लोभ त्याला खातो तसंच झालं. त्याच्या मृत्यूचं खरं कारण हाच भूतकाळ होता.’
गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजनच्या विरोधात साक्ष दिली
प्रकाश महाजन म्हणाले की, ‘गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती. त्या क्षणापासून एक वैर पेटलं, आणि आज जी बदनामी, हीच त्याच वैराची सावली आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘मुंडे साहेबांनी सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावर विश्वास ठेवून जमीन घेतली होती. आज त्याच जमिनीवरून केस करून पंकजा मुंडेवर डाग लावले जात आहेत. केवळ ‘महाजन’ हे आडनाव असल्यामुळे लोक गप्प आहेत, पण जर धनंजय आणि पंकजांनी आवाज उठवला, तर उद्या वकीलसुद्धा त्यांना मिळणं कठीण होईल.
बदनामी करणं हा व्यवसाय झाला
प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवला. ते म्हणतात, ‘सारंगीला वाटतं पंकजा बिघडलेली आहे. पण तुम्ही परळीला जा आणि लोकांना विचारा, कोण बिघडलेलं आहे ते कळेल. तुम्हाला रक्ताचं नातं नसू शकतं, पण मला आहे. वडील गेल्यावर त्या मुलीवर किती संकटं आली हे मला ठाऊक आहे. आणि तुम्ही केवळ स्वार्थासाठी तिच्यावर बोट ठेवता?’ ते पुढे म्हणाले की, ‘तुम्हाला गोपीनाथ मुंडेंचा फोन गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळतो, तुम्हाला प्रमोद महाजनने सांगितल्यावर अमेरिकेचा व्हिसा मिळतो, त्यावेळी तुम्हाला प्रवीण महाजन, गोपीनाथ मुंडे चालत होते, त्यांच्या मुलाची बदनाम करताना थोडी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही का? अशीही विचारणा त्यांनी सारंगी महाजन यांना केली.
तरीही फोंडा सारखा वकील तुम्हाला कसा परवडला ?
ते पुढे म्हणाले, ‘तुमचा नवरा काही काम करत नव्हता, तरीही फोंडा सारखा वकील तुम्हाला कसा परवडला? गावोगावी पुस्तकं घेऊन फिरता आणि इतरांच्या चरित्रावर चिखलफेक करता. ज्याची लाज वाटली पाहिजे त्याचाच अभिमान तुम्ही बाळगता. प्रवीण महाजन यांनी जर खरोखर पुस्तक छापलं, तर त्यात स्वतःच्याही काही नग्न सत्यांचा फोटो ठेवायला हवा होता.’ ते म्हणाले की, ‘तुम्ही कोणावर शिंतोडे उडवले नाहीत? पुनमवरसुद्धा ते उडवलेत आणि आता पंकजा मुंडेवर? गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीवर जे काही संकट आलं, ते पाहूनसुद्धा तुम्ही शांत बसू शकला नाहीत. केवळ जुनी वैरभावना आणि स्वार्थासाठी तुम्ही तिच्या सन्मानावर वार करता.


