डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं…
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक २०२८ मध्ये होणार आहे. याला अद्याप बराच अवकाश आहे. मात्र असे असले तरी, या निवडणुकीसंदर्भात राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा रंगताना दिसत आहेत. यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संभाव्य उमेदवारांसंदर्भात आणि स्वतः संदर्भातही मोठे विधान केले आहे.
याच बोरबर त्यांनी आपण उपराष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचेही स्पष्ट केले.
ट्रम्प यांच्या मते मजबूत दावेदार कोण? –
राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीबद्दल बोलताना ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षातील दोन प्रमुख नेत्यांची नावे घेतली. त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना ‘महान व्यक्तिमत्त्व’ म्हटले असून, ते मजबूत दावेदार सिद्ध होऊ शकतात. वेंस आणि रुबियो एकत्र आले, तर त्यांना थांबवणे ‘अशक्य’ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर, “मला असे करायला आवडेल. माझे आतापर्यंतचे आकडे सर्वात चांगले आहेत,” असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
उपराष्ट्राध्यक्षपदासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला असे करण्याची परवानगी मिळू शकते, पण मी असे करणार नाही. ही खूप ‘क्यूट’ (विनोदी) कल्पना आहे. मी हे नाकारतो, कारण ही गोष्ट लोकांना आवडणार नाही. हे योग्य ठरणार नाही.”
काय सांगते अमेरिकेचे संविधान? –
महत्वाचे म्हणजे, अमेरिकेच्या संविधानातील २२ व्या दुरुस्तीनुसार, कोणत्याही व्यक्तीला तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढता येत नाही. यातच काही विश्लेषकांनी एक संभाव्य ‘लूपहोल’ सुचवला आहे. याच्या सहाय्याने ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढू शकतात. यानंतर जर राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराने राजीनामा दिला, तर ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. मात्र, ट्रम्प यांनी हा विचार ‘अत्यंत गोंडस पण अव्यवहार्य’ असल्याचे म्हणत फेटाळला आहे.


