भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युती न करता येणार्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका एकमेकांविरोधात लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
महाविकास आघाडीला तर आखाड्यात उतरावेच लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकांमध्ये तिरंगी सामने पाहायला मिळतील अशी दाट शक्यता आहे. तरीदेखील महाविकास आघाडीच्या गोटात अद्यापही शांतता आहे. ठाकरे शिवसेनेने हालचाली सुरू केल्या असल्या तरी काँग्रेस आणि आघाडीतील राष्ट्रवादी -शरद पवार गट यांच्याकडून मात्र अद्याप कोणत्याही घोषणा झालेल्या नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना नेमके आघाडी करून लढणार का? त्यांची रणनीती काय असेल? याचा तपशील अद्यापही बाहेर पडलेला नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला तळकोकणात अद्याप सूर सापडलेला दिसत नाही. महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी एकत्र येत सहा महिन्यानंतर सरकारच्या विरोधात आंदोलने उभारू असे जाहीर केले होते. परंतु आता महायुतीचे सरकार स्थापन होवून वर्ष पूर्ण होत आले असले तरी प्रभावी हालचाली आघाडीकडून दिसत नाहीत. गेल्या वर्षभरात ठाकरे शिवसेनेने काही वेळा मित्र पक्षांना सोबत घेवून काही प्रमाणात आंदोलने उभारली, अधिकार्यांच्या भेटीगाठी घेवून इशारे दिले. परंतु सत्तेच्या विरोधात जे रान उठवायला हवे होते तशी स्थिती सध्या नाही. किंबहुना ठाकरे शिवसेनेतून एकेक जण पक्षांतर करतो आहे.
दोन आठवड्यांपूर्वी माजी आमदार राजन तेली यांनी ठाकरे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे जोरदार स्वागतही झाले. संघटना वाढीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आमदार दीपक केसरकर यांच्याशीही जुळवून घेण्याची भूमिका जाहीर केली. तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांनीही ठाकरे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणखी काही जिल्हास्तरावरील नेते ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. अशावेळी ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सिंधुदुर्गात येवून शिवसैनिकांना जमवून येणार्या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. सावंतवाडीतही तेथील स्थानिक पदाधिकारी आपली स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आहे असे जाहीर करून शिवसैनिकांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाविकास आघाडीची मोट बांधण्याच्या प्रयत्नातून फारशा हालचाली दिसत नाहीत.
महिनाभरात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशी शक्यता आहे. भाजप आणि शिंदे शिवसेनेने यापूर्वीपासूनच निवडणूक पूर्व तयारी सुरू केली आहे. ठाकरे शिवसेनेकडून जास्तीतजास्त पदाधिकारी आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. काही ठिकाणी एकमेकांकडील पदाधिकार्यांचे पक्ष प्रवेशही होत आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि तळकोकण आपल्या ताब्यात हवे आहे म्हणून भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेना बॅकफुटवर गेल्यानंतर रिकामी झालेली स्पेस आपणच भरून काढावी यासाठी दोन्ही पक्षांकडून आटोकाट हालचाली सुरू आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये आपलाच अध्यक्ष बसावा असे प्रयत्न महायुतीतील या दोन्ही मित्रपक्षांकडून सुरू आहेत. असे असताना महाविकास आघाडीच्या तंबूत फारशा हालचाली दिसत नाहीत.
ठाकरे शिवसेनेतून आऊट गोईंग सुरू असताना ते थांबविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रभावी प्रयत्न सुरू नसल्याचेही दिसते आहे. या पक्षासाठी सध्या कसोटीचा काळ आहे. या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळविणे सगळ्यात महत्त्वाचे वाटते आहे. त्यामुळे नेत्यांनी सध्या मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. माजी आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांना नेतृत्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीतील पराभवानंतरही त्यांनी आपल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातील लोकसंपर्क कमी केलेला नाही. त्या तालुक्यातील गावांमध्ये ते पूर्वीप्रमाणेच फिरत आहेत. ठाकरे शिवसेनेला पक्षश्रेष्ठींकडून जिल्ह्यात किती बळ मिळेल यावर या पक्षाची जिल्ह्यातील वाटचाल अवलंबून आहे.
गेली दहा वर्षे तळकोकणातील काँग्रेसचे दिवस फारसे चांगले नाहीत. काँग्रेसचे मतदार जिल्ह्यात आहेत, परंतु संघटना वाढीसाठी जे बळ हवे आहे ते बळ पक्षश्रेष्ठींकडून म्हणावे तसे मिळत नाही. पूर्वीसारखी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावांत असलेले काँग्रेसचे नेटवर्क आता राहिलेले नाही. अद्यापतरी येणार्या निवडणुकांमध्ये काय स्ट्रॅटेजी राहील हे काँग्रेसने जाहीर केलेले नाही. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा एक वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर या वर्गामध्ये दोन गट पडले आहेत. मुळात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पक्षाची फारशी मोठी ताकद नव्हती. गेल्या दहा वर्षात ती कमी कमी होत गेली. त्यात पुन्हा फूट पडल्यामुळे या पक्षाच्या दोन्ही गटांचे नेटवर्क संपूर्ण जिल्हाभर गावोगावी नाही. तसेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही निवडणूक स्ट्रॅटेजी अद्याप जाहीरपणे सांगितलेली नाही.
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या ताकदीसमोर महाविकास आघाडी अद्यापही आत्मविश्वासाने उभी ठाकलेली दिसत नाही. खरेतर येणार्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आपले नेटवर्क निर्माण करण्याची संधी आहे; परंतु त्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीच्या गोटात शांतता आहे, ते ताकदीने लढू शकणार नाहीत हे लक्षात आल्यामुळेच महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने एकत्र न लढता मैत्रीपूर्ण लढती करण्याचे ठरविलेले दिसते. जेणेकरून या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता अंतिमत: महायुतीचीच राहील, ही त्यामागची स्ट्रॅटेजी आहे.


