नागपूर जाम केल्यानंतर बच्चू कडूंचा सरकारला इशारा !
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे.
त्यामुळे यवतमाळ नागपूर, चंद्रपूर -नागपूर हे सर्व महामार्ग बंद पडले आहे. महामार्गांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनात भाजपाचे आमदारही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे की दुपारी १२ वाजेपर्यंत “आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही महाराष्ट्र जाम करणार.” तर, “बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
नागपुरातील आंदोलनामुळे चार राष्ट्रीय महामार्ग ठप्प असून १४ तासांहून अधिक काळ वाहतूक बंद आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आंदोलनाच्या सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफासामुळेच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर, मुलीच्या कुटुबियांनी हत्येचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.
शिवसेनेने (उबाठा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून मुंबई महानगरपालिकेत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ज्यांचं वय ६० वर्षांहून अधिक असेल त्यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेश व ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. तर, सुरक्षिततेसाठी हजारो लोकांना किनाऱ्यापासून दूर हलवण्यात आलं आहे.


