पंकजा मुंडे गहिवरल्या…
मी राजकारणात नव्हते, मला गोपीनाथ मुंडेसाहेबांनी आमदार केले. त्यांच्या लोकसभा निवडणुकीत ते बीडमध्ये नव्हते, त्यांची निवडणुक तुम्ही कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर बाबा माझ्या कानात काही तरी सांगतायेत हा आमच्या घरातला फोटो मला आजही आठवतो. माझी लेक डझनभर आमदारांना पुरून उरली असे म्हणत ते माझ्या कानात मला बेटा थँक्यू म्हणाले.
एवढा मोठा माणूस मला थँक्यू म्हणाला, हा नम्रपणा त्यांच्यात होता, तोच माझ्या रक्तातही आहे, अशी आठवण सांगताना पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आज मला तुम्हालाही सगळ्यांना थँक्यू म्हणायचे आहे. माझ्या चांगल्या वाईट काळात साथ दिलीत. बहीण म्हणून मला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी दिलीत त्याबद्दल थँक्यू. माझ्यावर आंधळा नाही तर डोळस विश्वास ठेवला त्याबद्दल थँक्यू असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पाच वर्ष या महाराष्ट्राने माझे कष्ट पाहिले, कोणतेही पद नसताना तु्म्ही मला सोडून गेला नाहीत, त्याबद्दलही थँक्यू. आणि पद असतानाही माझी गरिमा कधी कमी होऊ दिली नाही, त्याबद्दलही मला तुम्हाला थँक्यू म्हणायचे आहे. परळी येथे झालेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले. माजी मंत्री बदामराव पंडीत यांचा भाजपामधील प्रेवशही याच कार्यक्रमात झाला.
कुठे युती होईल, तर कुठे स्वतंत्र लढावे लागेल. या संदर्भात लवकरच निर्णय होईल, पण तुम्ही तयार राहा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. हा मेळावा राजकीयच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला माझा पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे चांगले नेते सोबत येत असतील तर त्यांना घ्यायला काय हरकत आहे? असे म्हणत त्यांनी प्रकाश निर्मळ, बदामराव पंडीत, बाळराजे यांचे स्वागत केले.
परळीकरांसमोर बोलताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पहायला मिळाले. विशेषतः गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीची आठवण, पाच वर्षातील संघर्षाचा काळ, वैद्यनाथ कारखान्यावरून होत असलेली टीका या सगळ्या गोष्टींवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आले असे म्हणत त्यांनी परळीकरांचे आभार मानले. सामान्य माणसाच्या हिताला नख लागेल असा कार्यकर्ता कधी मी सांभाळला नाही.
पण माझ्या एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठते. माझ्या कार्यकर्त्याकडून कधीच कोणावर अन्याय झाला नाही. तुम्ही माझ्या इज्जतीला सांभाळलं, त्याबद्दलही तुमचे थँक्यू, असे पंकजा म्हणाल्या. गोपीनाथ मुंडेंनी खूप कष्ट केले, त्या कष्टाचा वारसा ते मला देवून गेले. त्या कष्टातही तुम्ही मला सांभाळलंत, त्याबद्दलही थँक्यू, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी परळीतील जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
जरांगे पाटील यांना साद
आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आपण कधीही चुकीचं बोलंलो नाही, असे म्हणत जातीपातीची दरी दूर करू, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. आपल्या भाषणातील मुद्दे चुकीच्या पद्धतीने दाखवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मराठा आरक्षणाबद्दल गोपीनाथ मुंडे यांनीही भूमिका जाहीर केली होती, तीच माझीही भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण दुसऱ्याच्या ताटातून नाही, यावर मी आजही ठाम असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगीतले. गॅझेट संदर्भातही आपण निझामाची औलाद वगैरे शब्द माझ्या तोंडून कधीही निघू शकत नाही, असे स्पष्ट केले.


