विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा – धडगाव मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झंडा फडकावित अपक्ष उमेदवारी करणाऱ्या माजी खासदार डॉ. हिना गावित या मंगळवारी मुंबई येथील कार्यक्रमात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत.
अनेक दिवसांपासून डाॅ. हिना गावित या भाजपबरोबर अनधिकृतरित्या काम करत असल्या तरी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या त्यांच्या घरवापसीमुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक बळकट होणार आहे.
दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवून आपल्या वक्तृत्वाने संसद गाजविणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही मन जिंकणाऱ्या डॉ. हिना गावित यांचा मागील लोकसभा निवडणूकीत पराभव झाला. जोरदार काम करुनही डॉ हिना गावित यांना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या तुफानी सभेमुळे पराभव पत्करावा लागला. त्यांना माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी पराभुत केले. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हिना गावित यांनी कंबर कसली होती.
त्यांनी थेट के. सी. पाडवींविरोधात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी केली. मात्र याच मतदार संघातून तत्कालीन विधान परिषद आमदार आमश्या पाडवी देखील इच्छुक होते. अशातच अक्कलकुवा – धडगाव मतदारसंघ हा महायुतीमध्ये वाटाघाटीत शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) वाटेला गेल्याने हिना गावितांचे समर्थक नाराज झाले. पक्षाने समजूत काढूनही हिना गावित यांनी बंडखोरी केली.
त्यांच्या बंडखोरीचा फायदा हा महायुतीलाच झाला. कारण मतांच्या झालेल्या विभाजनात काँग्रेसचे के..सी. पाडवी यांचा पराभव करुन शिंदे गटाचे आमश्या पाडवी विजयी झाले. गॅस शेगडी या चिन्हावर लढलेल्या हिना गावित आणि विजयी उमेदवारांमध्ये मतांचे अंतर चार ते पाच हजांराचे होते. तेव्हापासून त्या भाजपपासून दुर होत्या. अशातच त्यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित हे पुन्हा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्या अनधिकृतरित्या भाजपचेच काम करत होत्या.
त्या भाजपमध्ये परतण्याची अटकळ बांधली जात होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी त्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश होणार आहे. हिना गावित या अभ्यासू, हुशार आणि नरेंद्र मोंदी, अमित शाह यांच्या मर्जीतील नेत्या मानल्या जातात. तरुण पिढीतील हे अभ्यासू नेतृत्व असल्याने त्या खासदार असतांना त्यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्ता पदाची देखील धुरा होती. त्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाल्यावर त्यांच्यावर पक्ष कोणती जबाबदारी टाकणार, हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल.


