आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर अनिल परब यांचा पलटवार…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून अनेकदा सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
अशामध्ये सोमवारी (27 ऑक्टोबर) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील गोरेगाव येथे पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जसे मतचोरीचे सादरीकरण केले होते तसेच त्यांनी केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना महाराष्ट्राचे पप्पू, अशी थट्टा उडवली. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पलटवार केला आहे.
शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब म्हणाले की, “आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला आणि उत्तर कोण देत आहे?निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भाजप. आदित्य ठाकरेंनी काल चुकीची मत आहेत ते दाखवले. यामध्ये पप्पूपणा कसला आला? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला हवे. घरगडी असल्यासारखे काम हे भाजप करत आहे. भाजप आमच्यावर टीका करते म्हणजे काहीतरी घोळ झालेला आहे, हे नक्की. असा दावा अनिल परब यांनी करत भाजपवर टीका केली. पुढे अनिल परब म्हणाले की, निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर दिले पाहिजे. आम्ही प्रश्न विचारला एकाला, मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारला नाही. ते कशाला उत्तर देत आहेत? 1 तारखेचा मोर्चा असून त्यावर आवाज उठवला आहे. आम्हीच नाही तर सामान्य जनता रस्त्यावर आंदोलनाला उतरेल, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोगस मतांचा मुद्दा उपस्थित करत पत्रकार परिषद घेत मोठ्या स्क्रीनवर बोगस मतदार असल्याचे दाखवले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरे यांनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये. पण, जे राहुल गांधींनी केले तेच आदित्य ठाकरेंनी केले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच ते पुढे म्हणाले की, “राहुल गांधी यांनी खोदा पहाड निकला चुहा असे केले. दुर्दैवाने तेच आदित्य ठाकरेंनी केले आहे. राहुल गांधी यांच्या सर्व आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी बनू नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


