संतापले नेटकरी म्हणाले; हे लज्जास्पद आहे…
दिवाळीनिमित्त सगळेच एकमेकांना भेटवस्तू देतात, मिठाई देतात. तसेच सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या मित्र-मैत्रिणींप्रमाणेच त्यांच्या स्टाफला देखील दिवाळीनिमित्त गिफ्ट्स दिले आहेत. त्याचपद्धतीने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या स्टाफला दिवाळी गिफ्ट आणि बोनस दिला आहे.
दिवाळीच्या काही दिवसांनंतर, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या त्यांच्या स्टाफला जे गिफ्ट दिले त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्यांनी दिवाळीत त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे, परंतु काही नेटकऱ्यांनी बिग बींनी स्टाफला दिलेल्या गिफ्टबद्दल एक नाराजी व्यक्त केली आहे.
स्टाफला मिठाईसोबत रोख रक्कम देण्यात आली
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक कंटेंट क्रिएटर अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील घराबाहेर दिसत आहे. जिथे तो त्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलत आहे. व्हिडिओमध्ये, क्रिएटर म्हणतो, येथे मिठाई वाटली जात आहे. हे अमिताभ बच्चन यांचे घर आहे. तो कॅमेरा फिरवून आजूबाजूचा परिसर दाखवतो. व्हिडिओमध्ये, एका स्टाफ सदस्याने स्पष्ट केले की मिठाईसोबत रोख रक्कम देखील देण्यात आली होती. त्याला किती पैसे मिळाले असे विचारले असता, त्याने उत्तर दिले, 10,000 रुपये आणि मिठाईचा बॉक्स.
अमिताभ यांनी स्टाफला दिलेल्या दिवाळी गिफ्टबद्दल अनेकांची नाराजी
दरम्यान व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, बॉलिवूडमधील सर्वात मोठे स्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये आणि मिठाई दिली. व्हिडिओमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना भेटवस्तू मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच एका वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांच्या घराजवळचा आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांचा आहे याची पुष्टी केलेली नाही. हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. काहींनी अमिताभ यांच्या या दिवाळी गिफ्टबद्दल कौतुक केले आहे तर काहींनी फक्त 10,000 रुपये दिल्याबद्दल खूपच कमी आहे असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान यावर अजून अमिताभ बच्चन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका नेटकऱ्याने म्हटलं आहे , हे खूप कमी आहे. एका स्टारसाठी 24तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापेक्षा जास्त मिळायला हवे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, 10,000 रुपये खूप कमी आहेत. तर अनेक युजर्सने म्हटले की, दिवाळीत कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार किंवा 20 ते 25 हजार रुपयांचा बोनस देणे सामान्य आहे. दरम्यान, कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या भव्य भेटवस्तू दिल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे फारच लाजिरवाणे आहे.


