विरोधकांचा इतका पराभव करा की ते दुर्बिणीतूनही दिसणार नाहीत, असे विधान केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शहा यांनी केले आहे. सोमवारी (ता. 27 ऑक्टोबर) अमित शहा हे मुंबईत आले होते.
त्यांच्या हस्ते चर्चगेट येथील भाजपाच्या महाराष्ट्र मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर शहांनी भाषण केले. याच भाषणावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पण त्यांनी विरोधकांच्या पराभवाबाबत केलेल्या विधानानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शहांना प्रत्युत्तर दिले आहे. एक वेळ अशी येईल की भाजपाला शोधावे लागेल, असा टोला राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 28 ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, त्यांना ती वेगळी दुर्बिण निर्माण करावी लागेल. त्यांना दुर्बिणीचा नव्याने शोध घ्यावा लागेल. या देशात लोकशाही आहे. या देशामध्ये एक वेळ अशी होती की, भाजपाला दुर्बिणीतून शोधावे लागत होते. आमच्यासारख्या लोकांनी भाजपाचे अस्तित्व निर्माण केले. पण आता एक वेळ अशी येईल की, भाजपा दुर्बिणीतूनच काय तर लोकांच्या नजरेस सुद्धा पडणार नाही. हे भाकित नाही तर सत्य आहे. राजकारणात चढ-उतार होत असतात. असे तानाशाह, हुकूमशाह, या देशात, जगात आले आणि गेले आहेत. अशी भाषा वापरणारे देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहेत, असे खडेबोल राऊतांनी सुनावले आहेत.
तसेच, अमित शहा काही सर्वेसर्वा नाहीत. ते लोकशाहीच मालक नाहीत. जो माणूस या देशाच्या लोकशाहीत विरोधी पक्ष संपवून टाकू असा म्हणतो. त्याला आम्ही लोकशाहीतील सर्वात मोठा मुर्ख मानतो. उद्या आम्ही जरी सत्तेत असलो तरी आम्ही विरोधी पक्षाला ठेऊ. विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे. लोकसभेत राहुल गांधी आहेत, म्हणून विरोधी पक्षाचा, जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचत आहे. आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला, म्हणून सत्ताधारी रोज उघडे पडत आहेत. ही भीती आहे. सत्ताधारी डरपोक आहे, ते विरोधकांना घाबरत आहे, हे अमित शहांच्या वक्तव्यातून दिसत आहे. शहांच्या विरोधकांच्या संदर्भातील विधानाची दखल जग घेईल, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी अमित शहांसोबतच सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.


