जेलमध्ये टाका माघार घेणार नाही’; बच्चू कडू यांनी ठणकावले…
संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलन हे लोकांनी उभे केलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली हे मान्य आहे. न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होता.
आम्ही न्यायालयाचा आदर करतो, त्यांच्या आदेशाचा अनादर करणार नाही, असे सांगून बच्चू कडू यांनी लोक न्यायालयाचा अनादर होऊ देणार नाही, असे सांगितले. यावेळी त्यांनी प्रशासनात धमक असेल, तर आम्हाला अटक करून जेलमध्ये टाका, असे सांगून एकप्रकारे न्यायालयालाच आव्हान दिले.
‘हे आंदोलन लोकांचे आहे. लोकांनी निर्णय घेतल्यास आम्ही निघू. आम्ही न्यायालयाच्या (Court)आदेशाचा अनादर करणार नाही. आंदोलनासाठी आम्ही महिना भरापूर्वी परवानगी मागितली होती. परंतु, पोलिस आयुक्तांनी ती दिली नाही. आम्हाला पोलिसांनी येथून हटविल्यास आम्ही पुन्हा ताकदीने येथे उभे राहू. हे जनतेचे न्यायालय आहे. निर्णय जनता घेईल. मी त्याचे पालन करेल. लोक न्यायालय आणि विधी न्यायालय या दोघांचा हा निर्णय आहे. प्रशासनाची औकात असेल, तर आम्हा प्रत्येकाला अटक करून जेलात टाकावे.’ असेही आव्हान कडू यांनी प्रशासनाला दिले.
तत्पूर्वी, बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर शहरात अभूतपूर्व कोंडी झाली आहे. जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार त्यांनी केला आहे. यामुळे मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. शेकडो वाहने अडकून पडली आहेत. याची उच्च न्यायालयाने तातडीने दखल घेऊन आजच सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहे. आदेशामुळे नागरिकांना दिलास मिळणार असला तरी कडू यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयात आदेश, स्थळ रिकामे करा
या आंदोलनाची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची दखल स्वतःहून उच्च न्यायालयाने घेतली. जनहित याचिका दाखल करून दिवाळीच्या सुट्या असतानाही तातडीने सुनावणी केली. न्यायालयाच्या आदेशात सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास बच्चू कडू यांना बजावण्यात आले आहे. आदेशाची प्रत कडू यांना प्रत्यक्ष, ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवर पाठवण्यास सांगण्यात आले आहे.
रस्त्यांवर 500 ट्रॅक्टर
या आदेशाच्या पालनाचा अहवाल गुरुवारी (ता.30) सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने नागपूर पोलिसांना दिले आहे. आता यावर कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले आहेत. सुमारे 500 ट्रॅक्टर घेऊन कडू स्वतः आले आहेत.
टायरची जाळपोळ
राज्यातील विविध जिल्ह्यातूनही त्यांचे कार्यकर्ते आणि शेतकरी गाड्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासूनच वाहतूत कोंडीला सुरुवात झाली आहे. रात्री अनेकांना या आंदोलनामुळे पाच ते सहा तास अडकून पडावे लागले होते. आंदोलकांनी पर्याय मार्गावरही टायरची जाळपोळ केली. समृद्धी महामार्गावरचीसुद्धा वाहतूक रोखली होती. याशिवाय रेल्वे रोखण्याचाही इशारा दिला आहे.


