बच्चू कडू फडणवीसांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला निघाले असतानाच जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना…
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासाह 22 विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
अशातच आता आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंना मुंबईत चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. तर ते निमंत्रण कडू यांनी स्विकारलं आहे. सुरूवातीला कडू यांनी मुंबईत न जाण्याची भूमिका घेतली होती. मात्र, अखेर त्यांनी चर्चेसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, ते चर्चेला गेले तरी राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलन नियोजित ठिकाणी सुरूच राहणार असल्याचही कडू यांनी जाहीर केलं आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता त्यांच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे.
कारण मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. कडूंच्या आंदोलनामा पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
नागपुरला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, ‘तिथल्या आंदोलकांना त्रास होतोय, सगळे शेतकरी नागपूरला बसला आहेत. जेव्हा अटीतटीची वेळ असते. तेव्हा आपण शेतकऱ्यांसाठी सहकार्य केलं पाहिजे.
खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिला पाहिजे म्हणून मी नागपूरकडे निघालोय, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता जरांगे पाटील थेट आंदोलन स्थळी जाणार असल्याने आंदोलनाला आणखी बळ येणार असल्याचं बोललं जात आहे.


