तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली !
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडली आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. ५ हजार प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे, मात्र निधी अभावी वित्त विभागाकडून भरती प्रक्रियेस खोडा घालण्यात आला आहे.
महायुती सरकाराने सुरु केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा फटका इतर विभागांना सुद्धा बसू लागल्याचे चित्र आहे. लाडकी बहीण योजनेला निधीची पूर्तता करताना इतर विभागातील योजनांना आणि मान्यता दिलेल्या कामांना निधी अपुरा पडत असल्याचं चित्र आहे.
प्राध्यापकांची भरती वेळेत न झाल्यास राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन अधिकच घसरण्याची भीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केली आहे. शासकीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ११००० पदे प्राध्यापकांची रिक्त आहेत. त्यातील पाच हजार बारा प्राध्यापकांच्या भरतीची परवानगी सरकारकडून मिळाली असली तरी वित्त विभागाकडून त्याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे ती भरती रखडली आहे. याचा परिणाम उच्च व तंत्र शिक्षण विभागावर आणि परिणामी शासकीय विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षणावर होत असल्याचे चित्र आहे. सेवानिवृत्त झालेल्या ५ हजार १२ प्राध्यापकांच्या जागी नवीन प्राध्यापकांची भरती करण्यास मंजुरी देण्याची विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मान्यता देण्यात येत नसल्याने प्राध्यापकांची भरती रखडली आहे.
लाडक्या बहिणींची E KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.
दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेतील पात्र लाडक्या बहिणीनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.


