जैन बोर्डिंग डीलप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देणार !
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहार प्रकरणी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. जैन बोर्डिंग प्रकरणातून बिल्डर गोखले याने माघार घेतली असली तरी या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी धंगेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
एवढ्या मोठ्या जागेचा व्यवहार कोणी केला, याचा तपास व्हावा, असे धंगेकरांनी म्हटले. ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धर्मादाय आयुक्त आणि बाकी बिल्डर राजकारणी यांचे काय लागेबांधे आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. धर्मादाय आयुक्तालयात अनेक वर्षे प्रकरण पेंडिंग राहतात पण यावेळी लगेच सगळं का करण्यात आले?, असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. मी पोलीस ठाण्यात जी तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये कोणाचंही नाव लिहणार नाही. पण या व्यवहारात कोणाची नावं आहेत, याची माहिती घ्यायची असेल तर गोखलेंना विचारा. धर्मादाय आयुक्त एवढा फास्ट निर्णय कधीच देत नाहीत, असे धंगेकर यांनी म्हटले.
यावेळी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील गुन्हेगारीबाबतही भाष्य केले. शिंदे साहेबांनी थोडं थांबायला सांगितले आहे. मात्र पोलखोल तर व्हायलाच पाहिजे. निलेश घायवळ, रुपेश मारणे प्रकरणावर मी नंतर बोलेनच. कारण गुन्हेगारीवर बोललेच पाहीजे. पुण्यात 70 टोळ्या आहेत. हा विषय शिंदे किंवा फडणवीसांचा नाही, असे धंगेकर यांनी सांगितले.
मला राजकारणात सामना करण्यासाठी कोणी मर्द भेटलाच नाही: रवींद्र धंगेकर
मला राजकरणात मर्द भेटला पाहिजे. मला राजकरणात मर्द भेटत नाही, असे वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे मात्र गुलदस्त्यात आहे. धंगेकर यांनी आपल्या विरोधकांना इशारा देताना म्हटले की, त्यांच्या औकातीवर मला जायचंय, पण थोडे दिवस जाऊद्य सगळ्यांची औकात काढतो. माझ्या औकतीच्या पलीकडे जाऊन टीका करतात. मी कोणाच्या कुटुंबावर जात नाही मला चांगली शिकवण आहे. सत्ता जनतेसाठी असते. सत्ता घरात कशी येईल हे पाहणारे आपल्या सिस्टममध्ये काम करतात. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा मी आदर करतो, त्यांना जनतेची जाण आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.


