भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय चांगले व्यक्तिमत्व असून भारताशी लवकरच व्यापार करार केला जाईल, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केले आहे.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा स्तुती-सुमनांचा वर्षाव केला आहे. मात्र, ते चर्चा करण्यात अतिशय कठोर असून प्रतिस्पर्ध्याला नामशेष करण्याचा त्यांचा निर्धार असतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आशिया-प्रशांतीय आर्थिक सहकार्य संघटनेने आयोजित केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्नेहभोजन प्रसंगी ते मुख्य अतिथी या नात्याने भाषण करीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण कोरिया या देशात करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अणुयुद्ध मीच थांबविले. व्यापार कराराचा संबंध जोडून मी दोन्ही देशांना युद्ध थांबविण्यास भाग पाडले, असेही प्रतिपादन त्यांनी पुन्हा केले. गेल्या पाच महिन्यांमध्ये त्यांनी 47 व्यांदा हे प्रतिपादन केले आहे. प्रत्येक वेळी भारताने त्यांच्या या विधानाचा इन्कार केला आहे.
भारताशी व्यापार करार करणारच
मी भारताशी व्यापार करार करणारच आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अतिशय आदर आणि आस्था आहे. भारताशी अमेरिकेचे अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. पाकिस्तानचे नेतेही चांगले आहेत. त्यांच्याकडे एक फिल्ड मार्शल आहे. त्या सर्वांचा आणि माझा चांगला परिचय आहे. माझ्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्षात सात विमाने पाडण्यात आली आहेत. हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यांच्यातील संघर्ष थांबविला जाणे आवश्यकच होते, अशीही पुस्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी जोडली आहे.
युद्ध करण्याची दोघांचीही इच्छा
मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नेत्यांना दूरध्वनी करून युद्ध थांबविण्याविषयी बोललो होतो. तुम्ही युद्ध थांबविल्यास आम्ही तुमच्याशी व्यापार करार करणार आहोत. मात्र, तसे तुम्ही न केल्यास व्यापार करार होणार नाही. यावेळी दोन्ही देशांनी आमची युद्ध करण्याची इच्छा असून अमेरिकेने आम्हाला युद्ध करू द्यावे, अशी मागणी केली होती. ती मी मान्य केली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष थांबला, असे प्रतिपादन डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केले.
पंतप्रधान मोदी सर्वात देखणे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात ‘देखणे’ नेते आहेत. आपल्याला त्यांच्यासारखे पिता असावयास हवेत, असे प्रत्येकाला वाटेल, असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. पण चर्चा करताना ते अत्यंत कठोर होतात. ते जणू काही ‘कीलर’ असल्याप्रमाणे वागतात. ते अतिशय चिवट आणि बळकट मनोवृत्तीचे आहेत. संघर्ष करण्यास मी नेहमीच सज्ज असतो, असे ते स्वत:विषयी म्हणतात. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रसन्न आणि निश्चयी आहे, अशीही भरभरुन प्रशंसा ट्रम्प यांनी केली आहे.
भारताकडून सातत्याने इन्कार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात झालेला संघर्ष अमेरिकेने थांबविला या ट्रम्प यांच्या विधानाचा भारताने सातत्याने इन्कार केला आहे. जितक्या वेळा ट्रम्प यांनी हे विधान केले, तितक्याच वेळेला भारताने ते नाकारले आहे. भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून पाकिस्तानला मोठा दणका दिला होता. पाकिस्तानची अनेक युद्धविमाने, एवॅक्स यंत्रणा, अनेक वायुतळ आणि संपर्क यंत्रणा भारताने आपल्या क्षेपणास्त्रांच्या आणि युद्धविमानांच्या साहाय्याने नष्ट केल्या होत्या. अखेर भारताचा मारा सहन न झाल्याने पाकिस्तानच्या सैन्याधिकाऱ्यांनी भारताला संघर्षविराम स्वीकारण्याची विनंती केली होती. त्यानंतर चार दिवस चाललेला संघर्ष थांबला. मात्र, ‘सिंदूर अभियान’ अद्यापही होत आहे.


