सुप्रसिद्ध कीर्तनकार व अरुणा मध्यम प्रकल्प संघर्ष कृती समितीचे (मुंबई) सचिव, ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप महाराज (वय ६०) यांचे शुक्रवारी (दि.३१) पहाटे पंढरपूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
कार्तिकी वारीसाठी बुधवारी (दि.२९) परिवारासह मुंबईहून पंढरपूरला गेले होते. कीर्तन आटोपून तेथील निवासस्थानी परतल्यावर पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
मांगवली तिठ्यावरील आखवणे-भोम-नागपवाडी पुनर्वसन गावठाणात त्यांचे निवासस्थान असून, ते संपूर्ण कुटुंबीयांसह मुंबईत वास्तव्यास होते. दत्ताराम महाराजांचे वडीलही वारकरी संप्रदायात कीर्तनकार होते. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी वडिलांचा वारकरी संप्रदायासह कीर्तन वसा पुढे अखंड जोपासला होता. मुंबई ‘बेस्ट’मधून दोन वर्षांपूर्वीच उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. तरी गावच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून ते स्थापनेपासून काम करीत होते. अरुणा धरणग्रस्तांना ‘खासबाब’ म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर करून घेण्यात त्यांचे सर्वांत जास्त योगदान आहे, तसेच धरणग्रस्तांचा मोबदला व आखवणे भोम, नागपवाडी पुनर्वसन गावठाण निर्मितीत व सेवा सुविधा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
मुंबईत अंत्यसंस्कार
दत्ताराम महाराज यांच्या अकाली निधनामुळे आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणावर शोककळा पसरली आहे. पंढरपुरातून त्यांचे शव मुंबईत नेऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.


