दोन संशयित भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले; पावडेवाडी परिसरात खळबळ…
नांदेड – शहरालगतच्या पावडेवाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी दोन संशयित भावांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव रितेश पावडे असे असून, वर्षभरापूर्वी झालेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शनिवारी मध्यरात्री रितेश हा मित्रांसोबत जेवण करून घरी परतत असताना त्याचा काही व्यक्तींशी वाद झाला. या वादादरम्यान धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंजने, आणि पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत्यूपूर्वी रितेशने काही व्यक्तींची नावं सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी केशव पावडे आणि दिगंबर पावडे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
या हत्येमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिस सुरू आहेत. दरम्यान, भाग्यनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने पावडेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.


