पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी
तारापुर अणुशक्ती केंद्रातील युनिट क्रमांक ३ व ४ मध्ये आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेपासून ते ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत नियोजित बीएसडी (Boiler Shutdown) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या प्रक्रियेदरम्यान प्लांटमधील स्टीम जनरेटर रिलीफ वॉल्व्हमधून वाफ बाहेर सोडली जाणार असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्र प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये आणि ही नियमित तांत्रिक प्रक्रिया असल्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशी विनंती केली आहे.
तारापुर अणुशक्ती केंद्राकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, ही प्रक्रिया दर दोन वर्षांनी नियमितरित्या केली जाते. त्यामुळे परिसरातील नागरिक, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासनाने शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात रश्मिरंजन साहू वरिष्ठ प्रंबधक (मानव संसाधन) यांनी पत्राद्वारे तारापुर पोलीस स्टेशन तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना सूचना देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून नागरिकांमध्ये गैरसमज किंवा भीती निर्माण होणार नाही.तारापुर अणुशक्ती केंद्रात ही प्रक्रिया केवळ देखभाल आणि सुरक्षिततेसाठी केली जाते.परिसरात ऐकू येणारा आवाज हा केवळ वाफ सोडण्याचा असून कोणताही धोका नाही.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.


