प्रकरणात मोठा ट्विस्ट !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, या आरोपामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर जमीन ही अवघ्या तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप होत आहे, ज्या जमिनीची किंमती ही प्रत्यक्षात 1800 कोटी रुपये एवढी आहे.
एवढंच नाही तर तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार केल्यानंतर नियमानुसार दोन टक्क्यांनी 6 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण अपेक्षित असताना केवळ 500 रुपयेच भरल्याचं देखील समोर आलं आहे. यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित केल्याची माहिती देखील समोर आली होती, मात्र या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. सपकाळ यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे, त्यांनी ट्विट करत त्या संदर्भातील कागदपत्रं देखील शेअर केली आहेत.
नेमकं काय म्हणाले सपकाळ?
पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपण्याच्या प्रकरणात नाही तर पुण्याच्या बोपोडी येथील सर्वे नं. ६२ मधील अॅग्रीकल्चर डेअरीची शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तीस दिल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सरकारची ४० एकर जमीन हडपल्याच्या प्रकरणात तहसीलदार येवले याला अटक केल्याच्या बातम्या पसरवून हे दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. शीतल तेजवानी यांनी शासनाच्या मालकीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या जमिनीची विक्री केलेली आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आणि खरेदी करणा-या अमेडिया कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. फक्त दुय्यम निबंधकाला निलंबित करून चालणार नाही. जमिनीची विक्री करणारे आणि खरेदीदार या दोघांवरही खोटे दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे.’ असं ट्विट सपकाळ यांनी केलं आहे.
दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांना भस्म्या नावाचा आजार झाला आहे, भस्म्या नावाचा आजार झाल्यावर किती खाल्लं तरी अधिक खावच वाटतं, आधीच एवढं खाल्लेलं आहे अजून किती खाणार? असा हल्लाबोल सपकाळ यांनी यावेळी केला आहे.


