पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न झाल्याने वडेट्टीवार संतापले !
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचे नाव समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.
महार वतन जमीन विक्रीच्या या घोटाळ्यात सह जिल्हा निबंधक वर्ग 1 संतोष अशोक हिंगाणे यांनी चौकशी करुन बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी 420 (फसवणूक), 409, 334 आणि भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 316 (5) नुसार गुन्हा दाखले करण्यात आला. मात्र या प्रकरणात अजित पवारांचे सुपूत्र पार्थ यांचे नाव वगळून इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेसचे विधिमंडळ नेता विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (ता. 7 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे दोघेही पार्टनर आहेत. या एलएलपी मध्ये त्या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे असताना जर गुन्हे दाखल झाले आहेत, ते दिग्विजय पाटील, सहनिबंधक तारू आणि शितल तेजवानी या तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला राजकीय पाठिंबा, आशीर्वाद मिळत असल्याचे सुद्धा दिसत आहे. काही झाले तरी याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सांगत आहेत. हे सगळं घडतं, 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते. उद्योग संचलनालय त्याला 24 तासांत परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही, अद्यापही जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे. ती महार वतनाची जमीन आहे. गेली 25 वर्ष दलित लोक या जमिनीसाठी लढाई लढत आहेत. ती जमीन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार होतो आणि हे खरंच अजित पवारांना माहीत नसेल का? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला असल्याचे वडेट्टीवारांनी म्हटले आहे.
तसेच, एकूणच एक म्हण आहे की, “राज्यसभा मैं न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठायेगा…” तर असेच आता सुरू आहे. महायुतीचे सरकार म्हणजे, “आळी पाळी गुपचिळी”, “तू ही खा, मी ही खातो” “तू मला वाचव, मी तुला वातवतो.” असं आहे. या राज्यात आता चोर चोर मावस भाऊ असा कारभार सुरू असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. तर, यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती.
हा एवढा मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ती जमीन मूळ मालकाच्या नावावर करावी. केवळ टॅक्स भरला नाही म्हणून गेली 50 वर्ष या जमिनीचे 274 वारसदार लढत आहेत. महार वतनाच्या जमिनीची मोठ्या प्रमाणता विल्हेवाट लावली जात आहे. घोटाळ्यावर घोटाळे होत आहे आणि कोणतीच कारवाई होत नाहीये, असेही यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.


