तळकोकणात गुप्त बैठक अन्…
राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत टोकदार राजकीय संघर्ष होत असताना कोकणात मात्र नाट्यमय घडामोडी घडत आहेत.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्रित बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच तळकोणाच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. तळकोकणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कणकवलीतील माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना पाठिंबा जाहीर करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. मात्र याविरोधात आता कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नवी राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि शिंदेंच्या शिवसेनेची एकत्रितरित्या बैठक झाल्याची माहिती आहे. या दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नवीन व अनोखं उदाहरण हे तळकोकणात पाहायला मिळू शकतं.
सिंधुदुर्गातील या राजकीय घडामोडींची राज्यभर चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी सांगितलं की, “कणकवली शहर विकासासाठी केवळ ठाकरे गट नाही तर समाजसेवा करणारी सगळी मंडळी एकत्र येण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या विषयावर अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. आम्ही या सगळ्याची माहिती हा प्रस्ताव आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवल्यानंतर वरिष्ठांकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो ते पाहू,” अशी सावध प्रतिक्रिया राजन तेली यांनी दिली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदेंसोबत कसलीही राजकीय तडजोड होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तळकोकणात होत असलेली ही अनोखी युती उद्धव ठाकरेंना मान्य होणार का आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला ते मान्यता देणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.


