सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दुबईत आशिया कपचा अतिंम सामना झाला आणि पाकिस्तानी संघाला हरवून भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर नाव कोरलं.
मात्र त्यानंतर झालेला प्रकार अजूनही सर्वांच्या लक्षात असून विजेत्या भारतीय संघाला ही ट्रॉफी अद्यापही मिळालेली नाही. भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्या हातून ही ट्रॉफी घेण्यास नकार दिला, तर आपणच ट्रॉफी देणार या हट्टावर नक्वी अडून बसले. त्यानंतरही
भारतीय संघ न आल्याने अखेर नक्वी हे तिथून निघाले पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ते विजेती ट्रॉफीही त्यांच्यासोबतच घेऊन गेले.
तेव्हापासूनच आशिया कप ट्रॉफीचा हा विवाद सुरू झाला असून आता हे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचलं आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत बीसीसीआयने हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी आता आयसीसीने मोठं पाऊल उचललं असून याप्रकरणी एका समितीची स्थापन करण्यात आली आहे. आयसीसीची ही बैठक सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडली. पाकिस्तान आणि भारत क्रिकेट जगतासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी त्यांचे प्रश्न सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवावेत या मुद्यावर बैठकीतील सदस्यांनी भर दिला. या बैठकीत मोहसीन नक्वी देखील सहभागी झाले होते.
आयसीसीचा मोठा निर्णय
नक्वी यांनी भारताला ट्रॉफी न दिल्याबद्दल बीसीसीआयने बोर्डाला कळवले होते. आणि हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यासाठी आणि ट्रॉफी भारताला सुपूर्द करण्यासाठी आयसीसीद्वारे मोठा निर्णय घेत एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
नक्वींकडून ट्रॉफी का स्वीकारली नाही ?
2025 च्या आशिया कपचा फायनल सामना हा 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत खेळला गेला. भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. एसीसी अध्यक्ष म्हणून, मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला आशियाई कप विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी उपस्थिती लावली. मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंनी नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ती ट्रॉफी स्टेडियमबाहेर घेऊन जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे विजेता भारतीय संघ हा ट्रॉफी न घेताच परतला.
भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ही ट्रॉफी न स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे ते एसीसीचे अध्यक्ष असले तरीही ते पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. आशिया कपच्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही केले नाही. त्याचाच भाग म्हणून जिंकल्यावरही भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नक्वी यांना ईमेलद्वारे आशिया कप विजेतेपद भारतीय संघाला परत करण्याची मागणी केली होती आणि जर प्रतिसाद मिळाला नाही तर हा विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) उपस्थित केला जाईल असे म्हटले होते.


