माझ्या लाडक्या पोपटाची…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर कोरेगाव पार्क येथील ४० भूखंड खरेदी प्रकरणात आरोप करण्यात आले. त्यांच्या कंपनीने ही खरेदी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि इतरांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पार्थ पवार यांच्यावर या प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढे येऊन पार्थ पवार यांची बाजू सावरली होती. मात्र इतरवेळी अनेक मुद्द्यावर भाष्य करणारे पार्थ पवार यांचे बंधू आमदार रोहित पवार मात्र यावेळी शांत असल्याचे दिसले. यावरून आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे.
संजय शिरसाट यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यांनी लिहिले, ‘अरे रे.. माझ्या लाडक्या पोपटाची (रोहित पवार) वाचा गेली.’ त्यांच्या या पोस्टनंतर माध्यमांनी आज संजय शिरसाट यांना त्यांची भूमिका सविस्तर मांडण्याची विनंती केली. पार्थ पवार प्रकरणात रोहित पवारांना लक्ष्य करण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला असता शिरसाट यांनी रोहित पवारांवर तोंडसुख घेतले.
संजय शिरसाट म्हणाले, ‘राजकारणामधील काही लोकांना थोडासा किडा असतो. काही विषयावर ते विद्वानासारखे बोलतात. जसे काय तेच न्यायाधीश आहेत. हे लोक चालू घडामोडींवर मला बोलताना दिसले नाहीत. मागे एकदा माझी दाढ दुखत असताना त्यांनी (रोहित पवार) पोस्ट टाकली होती की, माझी दातखिळी बसली. त्यामुळे मला आता असे वाटत आहे की, याची वाचा गेली की काय?
नितीमत्तेच्या गप्पा मारणारे आणि स्वतःला विद्वान समजणाऱ्या या लोकांनी आताही बोलले पाहिजे. भले तुम्ही बाजूने बोला किंवा विरोधात बोला, पण बोलले पाहिजे ना. म्हणून एक्सवर पोस्ट करत म्हटले की, माझ्या पोपटाची वाचा गेली’, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी पार्थ पवार प्रकरणावर भाष्य केल्यानंतर आज शरद पवार यांनीही याबद्दल भूमिका मांडली आहे. अकोला येथे दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनीच हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. याबद्दल त्यांनी चौकशी समितीही स्थापन केली. त्यामुळे यातले वास्तव चित्र काय आहे ते जनतेसमोर आणावे.
तसेच ९९ टक्के कंपनीत भागीदार असूनही केवळ १ टक्के भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा कसा काय दाखल झाला? याबद्दल प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे.


