कुंभमेळ्यात मुस्लिमांना विरोध करताच हिंदू शेतकरी भडकले !
कुंभमेळा हा हिंदूंचा आहे. त्यात मुस्लिम धर्मियांना दुकाने लावण्यास परवानगी देऊ नये, असे म्हणतमंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळ्यात मुस्लिम धर्मियांच्या दुकानांना विरोध केला आहे.
राणे गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे विधान करून कुंभमेळ्याचा विषय चर्चेत आणला. राणे यांच्या नाशिक दौऱ्यावर त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकरी मात्र चांगलेच नाराज झाले. कुंभमेळा हिंदूंचा आहे या राणे यांच्या विधानावर त्यांनी संताप व्यक्त केला.
नाशिक शहरात दिवसभर दौरा करणाऱ्या नितेश राणे यांनी त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांना का भेट दिली नाही? असा प्रश्न त्यांनी केला. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील 15 किलोमीटर परिसरातील रस्ता 100 मीटर रिकामा केला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गर्दी नियंत्रणाचा पर्याय म्हणून तो निर्णय होत आहे. एनएमआरडीएकडून त्यासाठी दडपशाही करण्यात आली.
पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर हद्दीपर्यंत शेकडो शेतकऱ्यांचे घरे आणि बांधकामे पाडण्यात आली. यामध्ये बेरोजगार शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या दुकाने हॉटेल्स आणि अन्य इमारतींचाही समावेश आहे. यामध्ये शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. शासनाकडून अवघ्या सात दिवसांची नोटीस देऊन ही कारवाई झाली.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र कुंभमेळा मंत्री महाजन हे देखील प्रचंड तक्रारी आणि दबाव निर्माण झाल्यावर 10 दिवसांनी येथे आले होते. मंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळा आणि हिंदू यांचा संबंध जोडल्यामुळे त्यावर समाज माध्यमांवर प्रचंड टीका झाली.
इकडे हिंदूंची राख रांगोळी झाली. याची दखल राणे यांना घेता आली नाही का? असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन शेतकऱ्यांकडून सुरू होते. कैलास खांडबहाले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बारा दिवस साखळी उपोषण केले. त्यामागे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सकल हिंदू समाज आंदोलन असे फलक लावले होते. प्रत्यक्षात मात्र मंत्री राणे अथवा अन्य कोणी हे आंदोलनाकडे फिरकलेही नाही याची खंत आता व्यक्त होत आहे.


