तर अजित पवार राजीनामा देतील; कोकाटे यांचं मोठं वक्तव्य !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, त्यामुळे पार्थ पवार यांच्यासोबतच अजित पवार यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत, मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असं यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी म्हटलं आहे, त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मला आणि सर्व राष्ट्रवादी पक्षाला विश्वास आहे की अजित पवार हे कधीच चुकीचं काम करणार नाहीत, जर आरोप सिद्ध झाले तर अजित पवार राजीनामा देतील असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ही गोष्ट खरी आहे की अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. अजित पवारांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्यांचा स्वभाव कसा आहे? अजित पवार हे कधीच काही चुकीचं काम करणार नाहीत. त्यामुळे उगचच मीडियानं हे सर्व प्रकरण लावून धरलं आहे, विरोधी पक्षांकडून अजित पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा प्रकारचं कुठलंही काम दादा करू शकत नाहीत. हा माझा आत्मविश्वास आहे. माझाच नाही तर सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील आत्मविश्वास आहे असं यावेळी कोकाटे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एकनाथ खडसे म्हणाले जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, मग अजित पवार राजीनामा का देत नाहीत? याबाबत देखील कोकाटे यांना यावेळी विचारण्यात आलं. यावर बोलताना ते म्हणाले की, नुसतं आरोप करणं बरोबर नाही, ते आरोप सिद्ध पण झाले पाहिजेत ना, आम्ही जाहीरपणे सांगतो जी काही चौकशी आहे ती चौकशी करा आम्ही त्या चौकशीला सामोरं जाऊ, दोषी आढळले तर अजित पवार राजीनामा देतील, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
तसेच महायुतीमध्ये युतीसंदर्भात आणखी कोणताही निर्णय झालेला नाहये. युती करायची की नाही हे तेथील स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आहे, तसेच त्याबाबत तेथील स्थानिक नेतेच निर्णय घेणार आहेत असं ठरलेलं आहे, जर स्थानिक पातळीवर एकमत होत असेल तर स्थानिक नेते आणि आमदारांसोबत चर्चा करून तिथे युतीबाबत निर्णय होऊ शकतो. युतीबाबत आमची चाचपणी सुरू आहे, आम्ही आढावा घेत आहोत, काही ठिकाणी युती होऊ शकते, काही ठिकाणी युती होणार नाही, असंही यावेळी कोकाटे यांनी म्हटलं आहे.


