प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना !
राजधानी दिल्लीला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण घटना लाल किल्याजवळ घडली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक-१ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की, परिसरामध्ये मोठी घबराट आणि धावपळ सुरू झाली. या घटनेनंतर संपूर्ण दिल्ली शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हात निखळून पडला. कोथळा बाहेर आलेला..
संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळी चांदनी चौक मेट्रो स्टेशन आणि लाल किल्याच्या परिसरात हा स्फोट झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. या स्फोटाची तीव्रता अनेक किलोमीटरपर्यंत जाणवली. हा स्फोट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला थरार ऐकून अंगावर काटा येतो. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आवाज इतका मोठा होता की, आम्ही सगळे जागेवरच घाबरून गेलो. आम्ही थोडं पुढे जाऊन पाहिलं, तर एका कोपऱ्यात कुणाचा तरी हात पडलेला होता, तर दुसऱ्या ठिकाणी लोकांचे कोथळे बाहेर आलेले होते. हे सगळं बघून आम्ही हादरून गेलो.”
या स्फोटामुळे कारचे अक्षरशः तुकडे झाले आणि आसपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले, त्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
नेमकी घटना कधी घडली?
दिल्ली अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी ए.के. मलिक यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, आम्हाला चांदनी चौक मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने प्रतिसाद देत सात अग्निशमन युनिट्स घटनास्थळी पाठवले. सायंकाळी ७:२९ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत जीवितहानी झाली आहे.
दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक-१ जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये झाला. स्फोटाची तीव्रता खूप जास्त होती, त्यामुळे अनेकांच्या जखमी होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार ८ लोकांचा मृत्यू झाला आहे, पण हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.


