मध्यरात्री वेगवान घडामोड; तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी उचललं…
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या धक्कादायक माहितीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना यापूर्वीच अटक केली होती. याप्रकरणात आता तिसऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कांचन साळवी असं पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीच नाव असून त्याला बीडमधून अटक करण्यात आली आहे. कांचनला काल मध्यरात्री पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दादा गरड, अमोल खुनेनंतर आता कांचन साळवी हा तिसरा आरोपी अटक करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दादा गरड आणि अमोल खुने यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. दरम्यान साळवी याला अटक केल्याने आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
कोण आहे कांचन साळवी?
जालना पोलिसांनी अटक केलेला कांचन साळवी हा आरोपी आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून केला होता. पण, हा त्यांचा दावा मात्र धनंजय मुंडे यांनी फेटाळला होता. एवढंच नाही तर धनंजय मुंडेंनी मी नार्को टेस्टला सामोरे जायलाही तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी या प्रकरणाशी माझा काहीह संबंध नाही असं म्हटलं होतं.
दरम्यान, कांचन साळवीने अटकेपूर्वी त्याची बाजू मांडली होती. त्यानेही ‘माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि कोणत्याही चौकशी, नार्कोटिक्सला सामोरे जायला मी तयार आहे’, असं त्याने सांगितलं आहे. काल माध्यमांसमोर येत कांचन साळवीने आपण अमोल खुनेला ओळखतो पण, दादा गरडशी आपला काहीही संबंध नव्हता. तो मला कोही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करत होता, असा आरोप कांचन साळवीने केला होता.
दरम्यान, या अटकेनंतर आता पोलिसांकडून कांचन साळवी, दादा गरड आणि अमोल खुने यांच्यात काय संबंध आहेत याची चौकशी करण्यात येणार आहे.


