स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडायला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप हा कायम निवडणुकीसाठी तयार असतो.
आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच मिनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा जोरदार प्रयत्न करा. महायुतीच विजयी झाली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केली.
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली. आगामी निवडणुकीत नंबर वनचा पक्ष हा भाजपा राहिला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी आपला क्रमांक एकचा विरोधक आहे, हे लक्षात ठेवा. मित्रपक्षांना कुठेही दुखावू नका. स्थानिक पातळीवर कुठे समन्वय होत नसेल तर वरिष्ठ नेत्यांना सांगा, पण मित्रपक्षांच्या नेत्यांवर टीका करण्याचे टाळा. महायुती जिंकली पाहिजे, यासाठी सर्व जिल्हा प्रभारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून काम करावे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
निवडणूक प्रभारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड
भाजपच्या निरीक्षकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जी संभाव्य नावे प्रदेश भाजपकडे पाठविली असतील त्यातीलच एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे संघटनेच्या माध्यमातून आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. निवडणूक प्रभारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड जाहीर करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तर महायुतीच्या माध्यमातून दोन-तृतीयांश बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू, असा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
शिवसेना शिंदे गटावर बैठकीत तीव्र नाराजीचा सूर
शक्यतो महायुतीच व्हायला हवी, अशी भूमिका घेत तीन पक्षांच्या समन्वय समितीने बैठकीत एक रणनीती निश्चित केली. त्यानुसार स्थानिक पालकमंत्री आणि अन्य दोन पक्षांचे संपर्क मंत्री अशा तिघांची समिती प्रत्येक जिल्ह्यात येत्या दोन-तीन दिवसांत जाऊन महायुतीने एकत्रितपणे लढावे यासाठी प्रयत्न करेल.
सूत्रांनी सांगितले की, समन्वय समितीच्या बैठकीत शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी ठाणे-कोकणात भाजपचे स्थानिक नेते शिंदेसेनेवर उघडपणे टीका करीत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्हा प्रभारींनी महायुतीवर जास्तीत जास्त भर द्यावा, तसेच मित्रपक्षांवर टीकाटिप्पणी करू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती असेल. यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक असे तीन मंत्री समन्वयक असतील, असे बावनकुळे म्हणाले.


