बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावळले…
चिपळूण नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे, ज्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला डावळले जात असल्याचे समोर आले.
त्यामुळे पालिका निवडणुकीत महायुतीऐवजी युती होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार अंतर्गत संघर्ष सुरू झाला. पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याची तयारी महायुतीमध्ये सुरू झाली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मंगळवारी (11 नोव्हेंबर) चिपळूणमध्ये महायुतीची बैठक सुरु होती. मात्र या बैठकीचे निमंत्रण भाजप आणि शिवसेना यांना होतं. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांचे हेलिकॉप्टर सावर्डे येथे उतरल्यावर तातडीने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने बैठकीला बोलवले गेले असल्याचे समजते. त्यापूर्वी पहिली बैठक भाजप शिवसेना (शिंदे गट) यांची झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र त्यानंतर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांना बोलवण्यात आले.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये बेबनाव कारण राष्ट्रवादीला केले बाजूला केली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आमदार शेखर निकम हे मुलाखतीसाठी देवरुख मध्ये असल्याने ते या बैठकीला हजर राहू शकले नाही. परंतु पहिल्या बैठकीचे निमंत्रण अचानक राष्ट्रवादीला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकंदरित चिपळूणमध्ये राष्ट्रवादी भाजप शिवसेनेबरोबर आहे की नाही याबाबत आता प्रश्न निर्माण झाले आहे.
चिपळूण नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे काम पुढील दोन दिवसांत सुरू होईल. मात्र महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. या पदासाठी महायुतीमध्ये तिन्ही पक्षांचे सक्षम उमेदवार आहेत. तसेच एका प्रभागात नगरसेवकपदासाठी तीन ते चार जण इच्छुक आहेत. जर शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवली तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी काही जागा सोडेल.जागावाटपाच्या या प्रक्रियेत शिवसेनेला आपल्या हक्काच्या जागाही मित्र पक्षाला द्यावे लागतील त्यामुळे महायुती झाली तर सर्वाधिक नुकसान शिवसेनेचे होणार आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शिवसेना पालिका निवडणुकीत केवळ भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. नुकतेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली त्यात नगराध्यक्ष पद शिवसेनेला देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये महायुतीत आपल्याला डावळले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.


