स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच, शिवसेना पक्ष व चिन्ह प्रकारण तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं?
यावर मागच्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज निकाल लागेल अशी चर्चा सुरु असतानाच न्यायालयाने सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाचा निर्णय हा दोन्ही पक्षासाठी धक्का मानला जात आहे.
शिवसेना पक्ष व चिन्ह प्रकारणांची सुनावणी बुधवारी दुपारी सुप्रीम कोर्टात पार पडली. यावेळी या प्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता होणार आहे. यावेळी सुप्रीम कोर्टात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर युक्तिवाद होणार आहे. या दिवशी युक्तिवाद करण्यासाठी दोन्ही पक्षांना दोन-दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 26 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आता 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यानतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.


