शिवसेना ठाकरे गट; मनसे युतीबाबत चंद्रकांत खैरे यांचं मोठं विधान !
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, प्रचाराला देखील वेग आला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द केला होता, त्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पहायला मिळालं.
त्यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली, यावर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दाव्याने सांगतो दोन्ही भाऊ एकत्र आले तरच, मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते, असं खैरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले खैरे?
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यामुळे मोठा फरक पडेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर विजयी मिळू शकेल, हे कोणीही नाकारू शकत नाही. ही मुंबई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे, त्यांच्यामुळे मुंबई वाचलेली आहे, नाही तर या लोकांनी मुंबई कधीच तोडली असती. तेव्हाचे काँग्रेसचे सरकार असेल किंवा आताचे केंद्र सरकार असेल मुबई कशी काबीज करायची? असा त्यांचा प्रयत्न असतो. पण मराठी माणूस हा मराठी नेतृत्वाकडे पहात आहे, त्यामुळे दाव्याने सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते.सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढायला लागले आहेत, पण कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, असं यावेळी चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
माझी विनंती आहे की, सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी आपल्याला निवडून येण्यासाठी तडजोड करावी लागेल, नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल. काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे. काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तर कसा मजबूत होणार? बिहारमध्ये किती जागा लढल्या पण एकच जागा आली. राहुल गांधी यांनी जी मतचोरी दाखवली त्याचा काहीच परिणाम बिहारमध्ये झाला नाही, असंही यावेळी खैरे यांनी म्हटलं आहे.


