जगाचं लक्ष आता दिल्लीकडे !
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2024 साली बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता. याच हिंसाचारात शेकडो बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला.
बांगलादेशी नागरिकांनी शेख हसिना यांचे सरकार उलथवून लावले होते. याच प्रकरणात बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने शेख हसिना यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी ठरवण्यात आहे. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, शेख हसिना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली असली तरी भारत मात्र जगाच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण भारताच्या भूमिकेवरच शेख हसिना यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
नेमका निर्णय काय झाला? काय घडतंय?
शेख हसिना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी असताना जुलै- ऑगस्ट 2024 मध्ये त्या देशात मोठा हिंसाचार झाला होता. विद्यार्थ्यांनी समोर येत तेथे मोठे आंदोलन उभे केले होते. नंतर या आंदोलनाची धक बांगलादेशाच्या राजधानीपर्यंत पोहोचली होती. आंदोलकांनी बांगलादेशची संसद, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. आंदोलकांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन सामानाची तोडफोड केली होती. या हिंसक आंदोलनाचे काही फोटो आणि व्हिडीओ तेव्हा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेख हसिना यांनी लष्कर, पोलिसांना कारवाईचा आदेश दिला होता. त्यानंतर आंदोलन जास्तच भडकल्याने यूएनच्या रिपोर्टनुसार एकूण 1400 लोकांचा मृत्यू झाला होता. हे आंदोलन नंतर एवढे पेटले होते की बांगलादेशमधील शेख हसिना यांचे सरकारच उलथवून लावण्यात आले. हसिना यांना जीव वाचवण्यासाठी देश सोडून जावा लागला होता. सध्या शेख हसिना बांगलादेशमध्ये नाहीत. आता याच प्रकरणात बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्यूनलने शेख हसिना यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
जगाचे लक्ष भारताकडे का लागले आहे?
बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्यूनलने शेख हसिना यांना फाशी देण्याचा आदेश दिलेला असला तरी जगाचे लक्ष आता भारताकडे लागले आहे. कारण 2024 साली बांगलादेशमध्ये हा हिंसाचार घडून आला तेव्हा शेख हसिना यांनी तो देश सोडून थेट भारतात आश्रय घेतला होता. आजदेखील शेख हसिना या भारतातच आश्रयाला आहेत. क्राईम ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार शेख हसिना यांना फाशी द्यायची असेल तर त्यांना अगदोर बांगलादेशात नेणे गरजेचे असणार आहे. सध्या शेख हसिना भारतात असल्याने भारतातून त्यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण करावे लागले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करावे लागले. या सर्व प्रक्रियेत भारत नेमकी काय भूमिका घेतो, यावरून शेख हसिना यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भारताने प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला सहाकार्य केल्यास शेख हसिना यांना बांगलादेशात परत नेले जाऊ शकते. परंतु काही कायदेशीर अडथळा निर्माण झाला तर शेख हसिना यांची फाशीची शिक्षा लांबू शकते किंवा त्यांना अभयही मिळू शकते. त्यामुळेच भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात नेमके काय होणार? भारताची भूमिका काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


