25 लाख द्यायला लागतात म्हणून सांगितला शेळ्या; कोंबड्या अन् बकरी खायला घालण्याचा मार्ग…
नाशिक, पुणे आणि नगर भागातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज वनमंत्री गणेश नाईक यांनी पुण्यामध्ये बैठक घेतली. या बैठकीनंतर गणेश नाईक यांनी सुचवलेला उपाय सध्या चर्चेचा विषय बनत आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांना कोंबड्या आणि शेळ्या खाऊ घालण्याचा उपाय सुचवला असून तो अमलात देखील आणला जाणार आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना गणेश नाईक म्हणाले, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांचा विचार केल्यास 1982 च्या दरम्यान हा भाग काहीसा ओसाड होता. त्यानंतर या भागामध्ये धरण बांधण्यात आली आणि या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात होऊ लागली त्यामुळे एक प्रकारे या भागाला जंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुरुवातीला या भागात इतर प्राणी ससे, लांडगे आणि कोल्हे होते. त्यामुळे बिबटे या प्राण्यांची शिकार करत असत. मात्र आता या प्राण्यांची संख्या घटल्यानेच हे बिबटे गावामध्ये येवून हल्ले करू लागले आहे. आता बिबट्यांची संख्या देखील खुप वाढली असून मानवी वस्तीमध्ये हल्ले देखील होत आहेत. त्यामुळे बिबट्या पकडण्यासाठी 200 पिंजरे उपलब्ध करण्यात आले असून आता त्यांची संख्या 1 हजार केली जाणार आहे.
मात्र हे पिंजरे लावत असताना शिकार म्हणून या पिंजरांमध्ये काही प्राण्यांना ठेवणं आवश्यक असतं. मात्र प्राणी मित्रांनी यावरत आक्षेप घेत असल्याने ते करता येत नाही. तरीदेखील बकरे आणि कोंबडे यामध्ये शिकार म्हणून ठेवण्यात येणार आहे.
तसेच एआयच्या माध्यमातून काही कॅमेरे लावले जाणार आहे. जेणे करून बिबट्या आला की सायरन वाजतील आणि त्यामुळे नागरिक सावध होतील. या सर्व उपाय योजनासाठी वन खात्याने 11 कोटी रुपयांची यंत्रणा पुणे जिल्ह्या करता उभारली आहे. आणि आता अहिल्यानगरमध्ये देखील ही यंत्रणा देण्यात येणार आहे. युद्ध पातळीवर बिबट्या हल्ल्याबाबत निर्णय घेतले जाणार असून जीवितहानी होणार नाही यांची काळजी घेतली जाणार आहे.
जंगलात बकरी हे बिबट्याला खाद्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू पडला तर 25 लाख रुपये सरकारला द्यावे लागतात. त्याच्या ऐवजी बकरी हे बिबट्याचं खाणं करून बकरी, शेळ्या जंगलात सोडून देऊन त्यांना बिबट्यासाठी करून दिल्यास नागरिकांवरील हल्ले कमी करण्याची मदत होईल अशी उपाय योजना वन मंत्र्यांनी सुचवली आहे.
तसेच वनतारालाही काही बिबट्या दिले जाणार असून याबाबत हालचाल सुरू आहे. 10 दिवसांत वनतारा मध्येही पाठवले जातील आणि आफ्रिका जंगलात देखील पाठवणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.


