लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या आत्मघाती स्फोटामागे अल-फलाह विद्यापीठातील फरिदाबाद (हरियाणा) कॅम्पसच्या आतून चालवल्या जात असलेल्या एका कट्टरपंथी व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलशी संबंध असल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
तपासात या विद्यापीठातील सुमारे 15 डॉक्टर बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती हाती येत असून त्यामुळे तपास यंत्रणांचे छापेसत्र सुरू झाले आहे.
त्यात पठाणकोटमधून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले; तर अनंतनाग येथील एका वैद्यकीय शिक्षण घेणार्या तरुणीला ताब्यात घेऊन चौकशी करून सोडण्यात आले. मात्र तिचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त केला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), हरियाणा पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक जम्मू-काश्मीर पोलिस व तेथील राज्य तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. 15 डॉक्टर बेपत्ता झाले आहेत आणि तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर डॉ. मुजम्मिल गनी आणि इतर काही डॉक्टरांना अटक झाल्यानंतर हे डॉक्टर अचानक गायब झाले.
बेपत्ता डॉक्टरांचा संशय
तपास यंत्रणांमधील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे 15 डॉक्टर बेपत्ता असून त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ आहेत. हे बेपत्ता डॉक्टर प्रामुख्याने डॉ. मुजम्मिल गनी याच्या संपर्कात होते. डॉ. मुजम्मिल याला व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलच्या चौकशीत अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
तपास यंत्रणांनी (आणि दिल्ली पोलिस स्पेशल सेल) या डॉक्टरांच्या शोधार्थ देशभरात छापे टाकणे आणि विशेष पथके तयार करणे सुरू केले आहे. बेपत्ता डॉक्टरांचे कॉल डिटेल्स आणि इतर नोंदी तपासल्या जात आहेत. हे डॉक्टर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या
नेटवर्कचा भाग असण्याची किंवा त्यांना कटाची माहिती असण्याची शक्यता तपास यंत्रणांना वाटते.
राष्ट्रीय तपास यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आर्थिक गुन्हे शाखा, आता अल-फलाह विद्यापीठाची (1997 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून सुरुवात, 2014 मध्ये खासगी
विद्यापीठ म्हणून स्थापना) तपासणी करत आहेत. या संस्थेचे रूपांतर दहशतवादी सेलसाठी सुरक्षित आश्रयस्थान कसे झाले, याचा तपास सध्या सुरू आहे.
रूम 13 आणि स्फोटकांचे मोठे भांडार
तपासकर्त्यांचे लक्ष कॅम्पसमधील बिल्डिंग 17 मधील रूम 13 आणि जवळील रूम 4 कडे वळले आहे. 8 ते 10 नोव्हेंबर या काळात धौज आणि फतेहपूर टागा येथे झालेल्या शोधमोहिमेत सुमारे 2,900 किलो स्फोटके आणि ज्वलनशील सामग्री जप्त करण्यात आली. त्यात अमोनियम नायट्रेट आणि मोठ्या प्रमाणात एनपीके खताचा समावेश आहे. न्यायवैद्यक पथकांच्या म्हणण्यानुसार स्फोटक पदार्थांचे मिश्रण लाल किल्ल्याजवळ वापरलेल्या स्फोटकाशी जुळणारे आहे. संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी यांच्यावरील 2000 मध्ये दाखल झालेला फसवणुकीचा एफआयआर आणि विद्यापीठाच्या कामकाजातील अनियमितता यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
अनंतनागमध्ये डॉक्टरच्या घरी छापा
दरम्यान, अनंतनाग येथून आलेल्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीरमधील व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल प्रकरणात राज्य तपास यंत्रणेने रविवारी अनंतनाग जिल्ह्यातील एका डॉक्टरच्या निवासस्थानी झडती घेतली. रात्री उशिरा अनंतनाग परिसरातील मलकाग येथे एसआयएच्या पथकांनी ही कारवाई केली. घरात भाडेकरू म्हणून हरियाणाची एक महिला डॉक्टर राहात असल्याचे आढळून आले. घरातून एक मोबाईल जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, याच प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले सुका मेव्याचे विक्रेते बिलाल अहमद वणी यांनी काझीगुंड परिसरात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी जीएमसी, अनंतनाग येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे पुत्र जासिर बिलाल अजूनही ताब्यात आहेत.
पठाणकोटमधील डॉक्टरला अटक
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पठाणकोट येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. रईस अहमद भट (वय 45) यांना अटक केली. डॉ. रईस भट यांनी यापूर्वी फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठात काम केले आहे. डॉ. उमर याच्याशी डॉ. भट यांचा संपर्क असल्याचे सांगितले आहे.
पती बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांची पत्नी पोलिस ठाण्यात आल्यानंतर आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याचे कळाल्यावरच स्थानिकांना आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना या अटकेबद्दल माहिती मिळाली.
असा शिजला कट
तपास यंत्रणांनी या दहशतवादी कटाचा मागोवा तीन टप्प्यांत घेतला आहे. 2019 ते 2021 या काळात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सुरुवातीमुळे हॉस्टेल, लॅब आणि वैद्यकीय कर्मचार्यांच्या हालचालींसाठी सोयीस्कर वातावरण निर्माण झाले. 2021 ते 2022 मध्ये प्रमुख आरोपींनी तुर्कस्तानला भेट दिली. त्यानंतर ते सांकेतिक चॅनेलद्वारे हँडलर्सशी जोडले गेले. यानंतर हे सर्वजण अल-फलाहमध्ये रुजू झाले आणि कटाची रणनीती रूम 13 मधून आखली गेली. 2023 ते 2025 हा सक्रिय तयारीचा काळ होता. सुरुवातीला 6 डिसेंबर 2025 रोजी अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना होती. मात्र ऑक्टोबरमधील एका आरोपीच्या अटकेमुळे त्यांना 10 नोव्हेंबरला घाईघाईने स्फोट घडवून आणावा लागला.
डॉक्टर निसार उल हसन कोण?
वैद्यकीय विभागाचे प्राध्यापक डॉ. निसार उल हसन हे देखील स्फोटानंतर बेपत्ता झाले आहेत. त्यांना यापूर्वी जम्मू-काश्मीर प्रशासनाने देशविरोधी कारवायांच्या संशयावरून सेवेतून बडतर्फ केले होते, तरीही त्यांची अल-फलाह विद्यापीठात नियुक्ती करण्यात आली होती.


