सांगितले कॅबिनेटवेळी कुठे होते मंत्री ?
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश पाहायला मिळत आहेत. अशामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी हे भाजपमध्ये तसेच भाजपचे काही कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत.
त्यामुळे महायुतीमधील घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच नेत्यांमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे मंगळवारी (18 नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची बातमी समोर आली. अशामध्ये सध्याची सुरु असलेल्या पक्षप्रवेशांमुळे नाराज असल्याने मंत्री गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. अशामध्ये आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांसमोर माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मंत्री योगेश कदम हे खेडमध्ये कामानिमित्त गेले आहेत. मंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या मतदारसंघात आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या आईंचे निधन झाल्याने ते त्यांच्या मतदारसंघात होते. मी वैद्यकीय कारणांमुळे रुग्णालयात होतो. त्यानंतर जिल्ह्याची आणि कोकणातील युतीसंदर्भात बैठक असल्याने मी रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आलो होतो. मला उशीर झाल्याने ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे निघून गेले. आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही. कोणत्याही मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहेत.
दरवेळी सूत्रांची माहिती खरीच असते, असे होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीत एकत्र उपस्थित आहेत, असे म्हणत त्यांनी नाराजीच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
मंत्रिमंडळात काय घडलं? याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरु आहे. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली असता ते म्हणाले की, उल्हासनगरमधून तुम्हीच फोडाफोडीला सुरुवात केली असे म्हटले. याबाबत उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, “असे शब्द ना शब्द तुम्हाला कसे कळतात? तिथे बोललेल तुम्हाला कसे कळते? हे फार मोठे कुतूहलच आहे. अशी चर्चा तिथे झाली का? याची माहिती घेऊन परत तुम्हाला सांगेन, असे ते म्हणाले.


