महायुतीतल्या नाराजीवर एकनाथ शिंदेंची मोठी माहिती !
महायुतीतील नाराजीनाट्यावरून आज (18 नोव्हेंबर) मोठ्या घडामोडी घडल्या. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही मंत्री या बैठकीला हजर नव्हता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्वच मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भापजात मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यावर यावेळी आक्षेप नोंदवण्यात आले. या भाजपा प्रवेशामुळे महायुतीत बिघाडी होते की काय? असा सवाल उपस्थित झाला होता. भाजपाने मात्र महायुतीत सर्वकाही आलबेल आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला. आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबाबत सर्वकाही बोलून दाखवले आहे. सोबतच महायुतीमध्ये आता नेमके काय ठरले आहे? याचीही माहिती त्यांनी दिलीय.
वातावरण खराब होऊ नये म्हणून…
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर भाष्य केले. “महायुतीला कुठेही गालबोट लागू नये. आम्ही महायुती म्हणूनच लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे वातावरण खराब होऊ नये अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की, महायुतीच्या पक्षांमध्ये होत असलेले पक्षप्रवेश थांबवण्यात येतील,” अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या जाणार
तसेच, भाजपातून शिवसेना, शिवसेनेतून भाजप किंवा महायुतीच्या पक्षांतर्गत कोणतेही पक्षप्रवेश होणार नाहीत, असे ठरवण्यात आले आहे. प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, असे ठरले आहे. तसा आदेश मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस हेदेखील तशा सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना देतील, असे ठरल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच महायुतीला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
नाराजीचे कारण समोर, आता पुढे काय होणार?
दरम्यान, भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपाच्या इतर काही नेत्यांनी महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही, असे सांगितले होते. सर्वकाही आलबेल आहे, असेच या नेत्यांकडून सांगितले जात होते. आता मात्र शिंदे यांनीच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीचे कारण काय होते, याची अप्रत्यक्षपणे कल्पना दिली आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


